Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा हवामानातील मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेलं 'शक्ती' हे तीव्र चक्रीवादळ आणि परतीच्या मान्सून वाऱ्यांतील बदल यांचा संयुक्त परिणाम राज्यावर दिसू लागला आहे. (Maharashtra Weather Update)
पुढील ४८ तासांत काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.(Maharashtra Weather Update)
'शक्ती' चक्रीवादळाची सद्यस्थिती
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता 'शक्ती' चक्रीवादळाने पश्चिममध्य आणि वायव्य अरबी समुद्रावर वेग घेतला.
हे वादळ सध्या मसिरा (ओमान) पासून सुमारे १८०किमी आग्नेयेस, कराची (पाकिस्तान) पासून ९३० किमी नैऋत्येस आणि द्वारका (गुजरात) पासून ९७० किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे.
या वादळाची तीव्रता पुढील काही तासांमध्ये कमी होत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. मात्र, वादळी वाऱ्यांच्या दिशेत झालेल्या बदलामुळे राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
कुठे पडणार पाऊस?
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
यलो अलर्ट : मराठवाडा, उत्तर कोकण, उत्तर आणि पूर्व विदर्भ
मुसळधार पावसाची शक्यता : मुंबई, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टी, पूर्व विदर्भातील काही जिल्हे
मुंबई हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण, गोवा आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपातील पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे.
परतीच्या मान्सूनचा वेग कमी
सध्या परतीचा मान्सून भारतातून बाहेर पडण्याच्या टप्प्यात आहे, परंतु 'शक्ती' चक्रीवादळामुळे वाऱ्यांची दिशा बदलल्याने हा वेग तात्पुरता मंदावला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत्या दोन दिवसांत सुरू राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* हवामानातील या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी काढणीसाठी तयार पिकांचे संरक्षण करावे.
* विजांचा कडकडाट असल्यास शेतात थांबू नये.
* वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याच्या मोटारींचे वापर नियोजनपूर्वक करावे.