Maharashtra Weather Update : राज्यात ऑक्टोबरच्या अखेरीस हवामानाने पुन्हा आपला रंग बदलला आहे. दिवसाढवळ्या तापमानात वाढ आणि रात्री विजांचा कडकडाट, वादळी वारे, आणि मध्यम पावसाच्या सरी अशी अस्मानी जुगलबंदी सुरू असून, हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)
उष्णता आणि पावसाचं अनोख रुप
देशात सध्या चार वेगवेगळ्या दिशांना चार भिन्न हवामानाचे प्रकार दिसत आहेत. महाराष्ट्रात मात्र एकीकडे दिवसभर प्रखर ऊन तर दुसरीकडे रात्री पावसाच्या सरी अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या हवामानातील तफावतीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून, शेतशिवारातही नुकसानाची भीती निर्माण झाली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह (३०-४० किमी/तास वेगाने) पावसाची शक्यता आहे.
४८ तासांची सावधगिरी
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या ४८ तासांमध्ये सर्वाधिक पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
कोकण (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) येथे मध्यम ते जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी आहे.
मुंबई, ठाणे, पालघर येथे शुक्रवारी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आहे.
पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठीही सोमवारपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नोव्हेंबरमध्येही पावसाची शक्यता
फक्त ऑक्टोबरच नाही, तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही कोकणात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर पावसाचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः सोयाबीन आणि हरभरा पिकाच्या कापणीपूर्वी हा पाऊस अडथळा ठरू शकतो.
पावसाचा मुक्काम अजून का?
मान्सून अधिकृतपणे माघार घेतली असली, तरी अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला निर्माण झालेली कमी दाबाची प्रणाली (Low Pressure Area) ईशान्येकडे सरकत आहे.
ही प्रणाली तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांना प्रभावित करत आहे. पश्चिम वायव्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे या भागांत पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, ऑक्टोबरच्या अखेरीस हिमालय पट्ट्यात नव्या पश्चिमी झंझावाताचं आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अधूनमधून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता पुढेही कायम राहू शकते.
शेतकऱ्यांना सल्ला
* पुढील ४८ तासांपर्यंत पावसाचा अंदाज असल्याने सोयाबीन, बाजरी, हरभरा किंवा कापूस यांची कापणी सध्या टाळावी. कापणी झालेला माल शेतात उघड्यावर ठेवू नये.
* पावसाचा अंदाज पाहता हरभरा, गहू, कांदा लागवडीसाठी जमिनीची तयारी सध्या थांबवून हवामान स्थिर झाल्यावर सुरू करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
