Maharashtra Weather Update : डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात कडाक्याची थंडी जाणवत असून उत्तर भारतातील शीतलहरींचा थेट परिणाम आता महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. (Maharashtra Weather Update)
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. उत्तर व मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरल्याने नागरिकांना गारठ्याचा तीव्र अनुभव येत आहे. (Maharashtra Weather Update)
उत्तर भारतात ऑरेंज अलर्ट; महाराष्ट्रातही थंडी कायम
IMD ने उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये थंडीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला असून, पर्वतीय भागात सक्रिय झालेल्या पश्चिमी झंझावातामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हीच थंड हवा हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
पुढील २४ तासांत गारठा वाढणार
राज्यात पुढील २४ तासांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. विशेषतः पहाटे व रात्री गारठा अधिक तीव्र जाणवेल. वर्षाच्या अखेरीस राज्यभरात नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार असून नववर्षातही हा गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, पुणे विभागासह मुंबई व लगतच्या काही भागांमध्येही तापमान घसरण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुढील ५ ते ७ दिवसांचा हवामान अंदाज
सध्या राज्यात थंडीच्या लाटेचा अधिकृत इशारा नसला तरी प्रत्यक्षात पहाटे आणि संध्याकाळी गारठा वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र असून नागरिक हुडहुडीने कापत आहेत.
पुणे, नाशिक, जळगाव : किमान तापमानात लक्षणीय घट
नाशिक व पुणे : ९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
मराठवाडा व विदर्भ : बहुतांश ठिकाणी १० ते १२ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान
उर्वरित महाराष्ट्र : पहाटे व संध्याकाळनंतर तापमान झपाट्याने घसरण्याची स्थिती
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ७ दिवसांत राज्यातील हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे. मात्र, थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे नववर्षाच्या सुरुवातीला देखील गारठा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सूचना
* पहाटे व रात्री गरम कपड्यांचा वापर करावा
* धुके व गारठ्यामुळे वाहनचालकांनी काळजी घ्यावी
* वृद्ध, लहान मुले व आजारी व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी
* उत्तरेतील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात वर्षाअखेरीस थंडीचा प्रभाव अधिक वाढणार असून पुढील काही दिवस नागरिकांना गारठ्याचा सामना करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गहू, हरभरा, ज्वारी, करडई आदी रब्बी पिकांमध्ये हलके पाणी देणे फायदेशीर ठरेल.
* भाजीपाला पिकांवर गारठ्याचा परिणाम टाळण्यासाठी संध्याकाळी किंवा पहाटे फवारणी टाळावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
