Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले असून, पुढील काही दिवस राज्यातील तापमानात मोठी घसरण होणार आहे. (Maharashtra Weather Update)
दक्षिणेकडील समुद्रात तयार झालेल्या हवामान प्रणालींमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्याचा परिणाम मुंबई, विदर्भ, मराठवाडा, पुणे, नाशिकपासून कोकणपट्टीपर्यंत सर्वच भागांत जाणवू लागला आहे. दिवसाचा उकाडा आणि रात्रीची कडाक्याची थंडी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.(Maharashtra Weather Update)
राज्यात तापमानात मोठी घसरण
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील २ ते ३ दिवसांत किमान तापमान तब्बल २ ते ३ अंशांनी खाली जाणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्रता आणखी वाढेल.
आधीच सुरु झालेल्या थंडगार वाऱ्यांचा जोर वाढणार असून, मुंबई आणि उपनगरातही रात्री तापमानात मोठी घट संभवते.
दक्षिणेकडील हवामान प्रणालींचा मोठा परिणाम
दक्षिणेकडील समुद्रात दोन महत्त्वपूर्ण हवामान प्रणाली सक्रिय आहेत.
'सेनयार' चक्रीवादळाचा उरलेला प्रभाव
बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशन, जे पुढील २४ तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता
ही प्रणाली उत्तर तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनाऱ्याकडे सरकत आहेत. त्यामुळे तामिळनाडूत २७ ते ३० नोव्हेंबर तर आंध्र प्रदेश व रायलसीमा भागात २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून महाराष्ट्रातील तापमानात अचानक घसरण होत आहे.
पश्चिमी विक्षोभ आणि चक्रवात परिसंचरण
मध्य पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या वरच्या स्तरावरील पश्चिमी विक्षोभ, तसेच राजस्थानातील चक्रवात परिसंचरण यांच्या संयोगाने उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट निर्माण होणार आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आगामी ४८ तासांत किमान तापमानात तीव्र घट दिसेल. थंडीचा कडाका वाढेल आणि गारवा दीर्घकाळ टिकू शकतो.
कोकणात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता
कोकणात तापमानात मोठी घसरण त्वरित होणार नसली तरी हवेतला गारवा वाढेल आणिढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही
मुंबईत रात्रीच्या तापमानात अचानक घट झाल्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांकडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन
तापमानातील अचानक बदलामुळे वृद्ध व्यक्ती, लहान मुले, दमा/श्वसन समस्या असलेले रुग्ण यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रात्रीची थंडी आणि दिवसाचा उकाडा शरीरावर ताण आणू शकतो, त्यामुळे घराबाहेर पडताना आवश्यक ते कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मच्छिमारांसाठी महत्त्वाचा इशारा
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बदलत्या परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे.
* पुढील ५ दिवस समुद्र खवळलेला राहू शकतो
* वादळी वारे आणि उच्च लाटांची शक्यता
* मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा कडक सल्ला हवामान विभागाने हा सतर्कता इशारा सर्व किनारी जिल्ह्यांना कळविला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* बागेत धूरकांडीचा वापर करून तापमान टिकवून ठेवा.
* पानांवर व फळांवर सूक्ष्म पोषक द्रव्यांची (बोरॉन, कॅल्शियम) फवारणी केल्यास फाटणे/गिरणे कमी होते.
