Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा हवामान अस्थिर होत असून, शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)
'शक्ती' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दक्षिण कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पिकांची काढणी आणि साठवण करताना शेतकऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 'शक्ती' या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचं वातावरण कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update)
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कोकण विभाग: रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा.
पश्चिम महाराष्ट्र: सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट.
मराठवाडा: बीड, धाराशिव जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह विजांचा कडकडाट.
पुणे जिल्हा: हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता.
तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांना अधिकृत अलर्ट नसला, तरी या भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विदर्भात हवामानाची स्थिती
पूर्व विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज असून, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ भागात तुरळक ठिकाणी सरींची शक्यता आहे.
तर उत्तर कोकण आणि उत्तर मराठवाड्यात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चक्रीवादळ 'शक्ती'चा परिणाम
'शक्ती' या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील दक्षिण आणि मध्य भागात ढगाळ वातावरण आणि अस्थिर हवामान राहील. हवामान विभागाच्या माहितीनुसार, १० ऑक्टोबरपर्यंत पावसाची सक्रियता कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काढणी आणि साठवण करताना विशेष काळजी घ्यावी.
महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीच्या पार्श्वभूमीवर अस्थिर हवामानाचा काळ सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर लक्ष ठेवून पिकांच्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलावी.
पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना प्रशासनाने आणि कृषी तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* सोयाबीन आणि मका काढणीदरम्यान काळजी घ्यावी.
* ओल्या मातीमुळे पिकांचे नुकसान होऊ शकते, बियाण्यांची गुणवत्ता घटते.
* पावसाचा जोर ओसरल्यानंतरच काढणी करावी.
* धान्य ओलसर ठिकाणी ठेवू नये, अन्यथा बुरशी व किडींचा प्रादुर्भाव वाढतो.
* ओलावा कमी केल्याने बियाण्यांचा टिकाऊपणा वाढतो.