Maharashtra Weather Update: राज्यासह देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढताना दिसत असून कधी कडाक्याची थंडी तर कधी अवकाळी पावसामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. (Maharashtra Weather Update)
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाच्या सरी बरसल्या, तर भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील काही दिवसांसाठी मोठा हवामान इशारा जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)
राज्यात आज कसं असेल हवामान?
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील बहुतांश भागात वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम अवकाळी पाऊस पडू शकतो. यासोबतच काही ठिकाणी जोरदार वारेही सुटण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता असली तरी राज्यात थंडी कायम राहणार असून, विशेषतः सकाळच्या वेळी तापमानात मोठी घट जाणवेल.
धुक्याचा अलर्ट; ऑरेंज आणि यलो इशारा
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी धुक्याबाबत ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी पहाटे नोएडापासून वाराणसीपर्यंत दाट धुक्याची चादर पसरलेली असण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवसांत उत्तरेकडील भागात तापमान आणखी घसरू शकते, ज्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील थंडीवर होणार आहे.
मुंबईत पावसाच्या सरी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाच्या सरींनी हजेरी लावली. गुलाबी थंडीत आलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला. दक्षिण मुंबईत तुलनेने जोरदार पाऊस, तर उपनगर आणि नवी मुंबईत हलक्या सरी बरसल्या. सकाळी कामावर निघालेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
विदर्भ-मराठवाड्यात गारठा वाढणार
विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका आधीपासूनच वाढलेला आहे. नागपूरसह विदर्भात यंदाचा डिसेंबर गेल्या काही वर्षांतील सर्वात थंड ठरला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आले आहे.
पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार असून, तापमानात १ ते २ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचा पुढील अंदाज काय?
हवामान विभागानुसार, अरबी समुद्रातून येणारे आर्द्र वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या थंड हवामानाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान हळूहळू वाढणार आहे. मात्र, त्यानंतर पुन्हा तापमानात २ ते ४ अंशांनी घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यात पुढील काही दिवस थंडी, धुके आणि अवकाळी पावसाचे मिश्र स्वरूप पाहायला मिळणार असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* अवकाळी पावसामुळे काढणीस आलेली पिके ताबडतोब सुरक्षित ठिकाणी साठवा.
* शेतात पाणी साचू नये यासाठी निचरा व्यवस्था खुली ठेवा, असा सल्ला देण्यात आला आहे.
