Maharashtra Weather Update : राज्यभरात पावसाचा जोर अधूनमधून वाढतोय आणि हवामान विभागाचे अलर्टही बदलत आहेत. शेतकऱ्यांसह नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
आज (२६ जुलै) रोजी पालघर, पुणे घाट, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जाहीर करण्यात आला असून जिल्हा प्रशासन सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुसरीकडे, काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असतानाही किरकोळ पावसाचीच नोंद झाली, ज्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह समुद्रकिनाऱ्यावरील भागांमध्ये ४.७ मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे किनारपट्टीवरील नागरिक व मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता असूनही फक्त किरकोळ पावसाची नोंद झाली आहे.
या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
पालघर, पुणे घाटमाथा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना आज (२६ जुलै) रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पावसामुळे काही भागांत पूरपरिस्थितीची शक्यता नाकारता येत नाही.
मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांना २६ जुलै सायंकाळी ५.३० ते २८ जुलै रात्री ८.३० या काळात ४.२ ते ४.७ मीटर उंच लाटांचा इशारा दिला आहे. यामुळे लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भात पावसाचा अलर्ट
हवामान विभागाने (IMD) ने विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून रेड अलर्ट जारी केला होता. परंतु प्रत्यक्षात नागपूर, अकोला, वर्धा, वाशिमसारख्या भागांत फक्त रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
नागपूर – १७.५ मिमी
चंद्रपूर – ६० मिमी
वर्धा – १५.८ मिमी
वाशिम – ३४.६ मिमी
बुलढाणा – १० मिमी
अकोला – ११.८ मिमी
अमरावती – ११.४ मिमी
गोंदिया आणि ब्रह्मपुरीसारख्या ठिकाणी मात्र ८० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली.
अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत ६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात शेती पाण्याखाली
गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसामुळे बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. तर इतर धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून परिसरातील शेतीक्षेत्र पाण्याखाली गेले आहे.
पुढील २४-४८ तास महत्त्वाचे
२७ जुलै रोजी अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर २६ जुलै रोजी पुन्हा एकदा चंद्रपूर, गोंदियासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्रीवादळसदृश प्रणाली आणि अरबी समुद्रातून आलेली द्रोणिका यामुळे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो.
नागरिकांना सूचना
* पावसाच्या वेळी ओढ्याजवळ, नाल्याजवळ जाणे टाळा
* प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करा
* आपत्कालीन स्थितीत १०७७ हॉटलाइन किंवा स्थानिक आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधा
* किनारपट्टीवरील नागरिकांनी समुद्रकिनारी जाणे टाळावे
राज्यातील पावसाचा जोर कुठे ओसंडून वाहतोय, तर कुठे हवामान विभागाच्या अंदाजाला छेद देतोय. आगामी काही तास आणि दिवस राज्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात.
शेतकऱ्यांना सुचना
मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पुढील गोष्टींकडे लक्ष द्या
* पिकांच्या रांगेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.
* शेतात पाण्याचा निचरा होण्यासाठी खाच-खळग्यांची व्यवस्था करा.
* मुसळधार पावसाच्या कालावधीत खते वा रासायनिक औषधांची फवारणी टाळा, अन्यथा त्याचा परिणाम कमी होतो.