Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी तडाखा पाहायला मिळत आहे. एका बाजूला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतकरी चिंतेत आहेत, तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.(Maharashtra Weather Update)
शुक्रवारनंतर शनिवारीही राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने अवकाळी पाऊस आणि उष्णतेचा इशारा दिला आहे.(Maharashtra Weather Update)
दक्षिण भारतातील कोमोरिन परिसरात निर्माण झालेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि नैऋत्य मध्य प्रदेशापर्यंत पसरलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात हवामानात मोठे बदल होत आहेत. याच परिणामामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.(Maharashtra Weather Update)
कोकणात उष्णतेचा कहर
कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला असला तरी हवेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा असह्य होत आहे.
विदर्भात 'ऑरेंज अलर्ट'; जोरदार वादळी पावसाचा अंदाज
विदर्भात हवामान सर्वाधिक अस्थिर झाले असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
याशिवाय वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, भांडारा, अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातही अवकाळीचा इशारा
मध्य महाराष्ट्रामधील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर याजिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तर पुणे, अहमदनगर आणि नाशिक भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
मराठवाड्यात विजांचा कडकडाट
मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता आहे.तसेच बीड, परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
गारपिटीमुळे शेती धोक्यात
गेल्या २४ तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत गारपीट झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे फळबागा, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत असून पिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
जळगावात राज्यातील उच्चांकी तापमान
देशातील सर्वाधिक तापमान जैसलमेर येथे ४५.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.
तर महाराष्ट्रात जळगाव येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून राज्यातील सर्वाधिक तापमानाचा विक्रम राहिला आहे. ढगाळ वातावरणामुळे काही भागांत तापमानात किंचित घट झाली असली तरी वाढलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा कायम आहे.
हवामान विभागाने पुढील काही तास राज्यातील हवामानात मोठे बदल कायम राहण्याची शक्यता वर्तविली असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा सविस्तर : Heatwave Alert : हीटवेव्ह की दिलासा? मे महिन्यात तापमानाचा 'अप-डाऊन' सुरू
अधिक वाचा : Cotton Farming : कापूस लागवडीवर संकट! उष्णतेमुळे शेतकऱ्यांनी घेतला मोठा निर्णय
