Maharashtra Weather Update : देशभरात हवामानाचे दोन टोकाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट कायम असून राजधानी दिल्लीत नागरिक हुडहुडी भरवणाऱ्या गारठ्याचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रात ढगाळ वातावरणामुळे हवामानात बदल जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)
उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावरही अप्रत्यक्षपणे होताना दिसत आहे. (Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (१५ जानेवारी) रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हवामानात बदल दिसून येणार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी सकाळच्या वेळेत गारवा जाणवणार आहे.
महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, तापमानात चढ-उतार
राज्यातील हवामानात मागील २४ तासांत लक्षणीय चढ-उतार नोंदवले गेले आहेत. काही भागांमध्ये थंडीचा कडाका कायम असताना, काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात फारशी घट झालेली नाही.
मात्र, दिवसा गार वारे आणि सूर्यप्रकाश यांचा मिश्र परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
घाटमाथ्यावरील भागांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार असून, पहाटे दाट धुके पडण्याची शक्यता आहे.
यामुळे दृश्यमानता कमी होऊन वाहनचालकांना काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात दमट आणि आंशिक ढगाळ हवामानाचा प्रभाव पुढील काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
मुंबईतील हवामान कसे असेल?
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान तुलनेने स्थिर राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील.
कमाल तापमान: सुमारे ३२ अंश सेल्सिअस
किमान तापमान: सुमारे २० अंश सेल्सिअस
यामुळे मुंबईकरांना सकाळी आणि रात्री आल्हाददायक गारवा अनुभवायला मिळणार आहे. कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात कमाल तापमान ३० ते ३३ अंशांदरम्यान, तर किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
विदर्भ-मराठवाड्यात वाढता गारठा
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका अधिक जाणवणार आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, परभणी, नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये पहाटे आणि रात्री तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
या भागांमध्ये किमान तापमान ११ ते १४ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. मात्र, दुपारच्या वेळेत सूर्याची तीव्रता वाढणार असून उष्णतेमुळे घाम फुटण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या २४ तासांतील प्रमुख शहरांतील किमान तापमान
मुंबई (कुलाबा) – २२.४° C
मुंबई (सांताक्रूझ) – २१.०° C
यवतमाळ – ८.८° C
वर्धा – १३.५° C
नांदेड – १४.२° C
ब्रह्मपुरी – १३.४° C
छत्रपती संभाजीनगर – १६.४° C
नागपूर – १२.४° C
राज्यात सर्वात कमी किमान तापमान यवतमाळ येथे ८.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
आज कसे असेल हवामान
कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
दिल्लीत थंडीचा कहर, धुक्याचा इशारा
उत्तर भारतात, विशेषतः दिल्ली आणि आसपासच्या भागांत थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे.
पुढील सात दिवस हवामान कोरडे राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नाही. मात्र, पावसाच्या अभावामुळे थंडी कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.
सकाळी आणि रात्री मध्यम ते दाट धुके पडण्याची शक्यता असून, यामुळे दृश्यमानता कमी होऊन रस्ते, रेल्वे आणि विमानसेवांवर परिणाम होऊ शकतो.
पुढील ४८ तासांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
देशातील हवामानाचा अंदाज
देशाच्या उत्तरेकडील भागांत शीतलहरींचा प्रभाव कायम राहणार आहे.
पश्चिम भारतात राजस्थान आणि गुजरातमध्ये हवामान कोरडे राहील. पूर्व भारतात तापमानात फारसा बदल दिसणार नाही.
तर, दक्षिण भारतात-विशेषतः तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले असून पावसाचा प्रभाव अद्याप कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गहू, हरभरा, ज्वारी, करडई या रबी पिकांमध्ये अति पाणी देणे टाळावे.
* ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यामुळे पिकांची नियमित पाहणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
