Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळ्याचा जोर वाढत असून शीतपर्वाची स्पष्ट चाहूल लागली आहे.उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात येत्या तीन ते चार दिवसांत थंडीचा प्रभाव अधिक तीव्र होण्याचा इशारा देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत राज्याच्या काही भागांमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ नोंदवली जाणार असली, तरी गारठा कायम राहणार आहे.(Maharashtra Weather Update)
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका
राज्यात प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम आहे. मागील २४ तासांत धुळे येथे राज्यातील सर्वात नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली.
थंडीच्या लाटेसारखी स्थिती काहीशी कमी होणार असली, तरी गारठा इतक्यात पाठ सोडणार नाही, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे आणि परिसरातही पहाटेच्या वेळी चांगलाच गारवा जाणवत आहे.
मराठवाडा-विदर्भात गारठा वाढणार
मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढील काही दिवस अधिक थंडीचे असणार आहेत. किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम जनजीवनावर होऊ शकतो.
विशेषतः ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी जाणवेल. येत्या तीन ते चार दिवसांत या भागांमध्ये आणखी गारठा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोकणातही थंडी
कोकणात दिवसाचे तापमान तुलनेने स्थिर असले, तरी रात्री आणि पहाटे गारठा जाणवत आहे. किनारपट्टी भागांमध्ये समुद्रावरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी अधिक हुडहूडी भरवत आहे. खाडी आणि सागरी किनारपट्टी क्षेत्रांमध्येही गारवा वाढलेला आहे.
घाटमाथ्यावर धुक्याची चादर
राज्यातील घाटमाथा परिसरात दाट धुक्याची चादर पसरली आहे. सकाळच्या वेळेत दृश्यमानता कमी होत असून, दिवस चढेपर्यंत धुकं टिकून राहत आहे. त्यामुळे गारठाही अधिक काळ जाणवत आहे. वाहनचालकांनी या काळात विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शेती व मत्स्यव्यवसायावर परिणाम
वाढत्या थंडीचा परिणाम शेती, फळबागा आणि फुलझाडांच्या शेतीवर होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. थंडीचा परिणाम मत्स्यव्यवसायावरही दिसून येत आहे.
उत्तर भारतातही थंडीचा जोर
उत्तर भारतात पर्वतरांगांमध्ये हिमवृष्टी सुरू असून, काही भागांत पावसाचीही नोंद झाली आहे. पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळे हे बदल होत आहेत.आठवड्याअखेरीस उत्तर भारतात पुन्हा थंडीची लाट येण्याचा अंदाज असून, हिमाचल प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याचा परिणाम देशभरातील हवामानावर जाणवण्याची शक्यता आहे.
एकूणच, वाऱ्यांची दिशा आणि हवामान प्रणालीत मोठा बदल न झाल्यास पुढील काही दिवस महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* राज्यात वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळे रब्बी पिके, भाजीपाला, फळबागा तसेच पशुधन यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
* थंडीमुळे वाढ खुंटू नये म्हणून पिकांवर सेंद्रिय द्रावणांची (जीवामृत, गोमूत्र अर्क) फवारणी करता येईल, असा सल्ला देण्यात आला आहे.
