Maharashtra Weather Update : राज्यात ऑक्टोबरच्या मध्यावरही हवामानात अस्थिरता कायम आहे. पहाटे गारठा जाणवतोय, तर दुपारच्या वेळी उष्णतेच्या झळा घाम फोडत आहेत. देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मान्सून माघार घेत असताना, दक्षिणेकडील किनारपट्टीवर पूर्वोत्तर मान्सूनचा प्रभाव दिसून येतोय. (Maharashtra Weather Update)
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील कमी दाबाचे पट्टे तसेच चक्राकार वाऱ्यांनी राज्याच्या वातावरणावर परिणाम करत तापमानात चढ-उतार निर्माण केला आहे.(Maharashtra Weather Update)
उष्णतेच्या झळा वाढणार
मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि विदर्भ भागात हवा कोरडी राहणार असून, दुपारच्या वेळी उष्णतेचा तडाखा अधिक जाणवेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
समुद्रावरील वाऱ्यांच्या दिशेमध्ये होणारे बदल लक्षात घेता कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ३६ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. ऑक्टोबरचा शेवट उष्णतेच्या झळांनी होईल.
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा!
पश्चिम महाराष्ट्रात दिवाळीच्या तोंडावरच हवामानात बदल होण्याची शक्यता असून, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि घाट क्षेत्रांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मराठवाड्यासाठी विशेष हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अहवालानुसार, २० ऑक्टोबरपर्यंत लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यांतही तुरळक सरींचा अंदाज आहे. २१ ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुढील पाच दिवसांमध्ये कमाल तापमानात मोठी तफावत जाणवणार नाही; परंतु किमान तापमानात थोडी घट होण्याची शक्यता आहे.
इसरो आणि सॅक अहमदाबादच्या उपग्रहानुसार, मराठवाड्यात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्याने शेतीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे.
आरोग्याची काळजी घ्या!
सतत बदलणाऱ्या हवामानामुळे ताप, सर्दी, उष्माघात आणि डोकेदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडताना पुरेसे पाणी प्यावे, डोकं झाकून ठेवावे आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याने फवारणी, काढणी आणि अंतरमशागतीची कामे त्वरित पूर्ण करावीत.
* रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : काळ्या ढगांचा खेळ सुरू; सायंकाळी पुन्हा बरसणार का?