Maharashtra Winter Weather Update : उत्तर भारतातून सक्रिय झालेल्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रातील थंडीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात चढ-उतार होत असले तरी पहाटे आणि रात्री गारठ्याची तीव्रता वाढत असल्याचं चित्र आहे. (Maharashtra Weather Update)
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्यात थंड आणि कोरडं वातावरण कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या बहुतांश भागांत पहाटे थंड वारे, धुके आणि रात्री गारठा जाणवण्याची शक्यता असून दिवसाच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशामुळे थोडी उब जाणवू शकते. (Maharashtra Weather Update)
वर्षाच्या अखेरीस थंडीचा प्रभाव अधिक तीव्र होणार असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
कोकण विभागात धुके, थंड वारे
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत ३१ डिसेंबर रोजी अंशतः ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सकाळच्या वेळी धुकं पडण्याचा अंदाज आहे.
मुंबईत कमाल तापमान सुमारे ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि पालघर भागांत किमान तापमान १६ ते १८ अंशांदरम्यान राहू शकते. त्यामुळे दिवस उष्ण वाटला तरी सकाळी आणि रात्री थंडीचा अनुभव येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्यात थंडीचा जोर
पश्चिम महाराष्ट्रासह पुणे शहर आणि परिसरात थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पहाटेच्या वेळी धुक्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात किमान तापमानात घट होत असून नागरिकांना थंड हवामानाचा अनुभव येत आहे.
मध्य महाराष्ट्रातील नाशिक परिसरात रात्रीचं तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता असून धुक्याचं प्रमाण वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यात थंडी कायम
मराठवाडा विभागातही थंडीचा प्रभाव कायम आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान सुमारे २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात दिवसाचं तापमान साधारण २८ अंश सेल्सिअस राहणार असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येऊ शकते.
विदर्भात किमान तापमानात मोठी घट
विदर्भातील थंडीचा जोर अद्याप कमी झालेला नाही. नागपूरमध्ये ३१ डिसेंबर रोजी कमाल तापमान सुमारे २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
गोंदिया, यवतमाळ आणि गडचिरोली या भागांत किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात असल्याने गारठ्याची तीव्रता अधिक जाणवू शकते.
राज्यभर थंड आणि कोरडं वातावरण
महाराष्ट्रात थंड आणि कोरडं वातावरण राहणार आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये रात्री आणि पहाटे तापमान ८ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता असून थंडीचा अनुभव अधिक तीव्र होईल. दिवसाच्या वेळी तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअसदरम्यान राहणार असलं तरी सूर्यास्तानंतर गारठा वाढण्याची शक्यता आहे.
वर्षाच्या अखेरीस हवामानात फारसा बदल होण्याची चिन्हं नसून नववर्षाच्या सुरुवातीलाही थंडीचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* हरभरा, गहू, कांदा, वाटाणा, भाजीपाला पिकांवर थंडीचा ताण येऊ शकतो.
* पहाटे दव जास्त असल्यास हलकी पाणीफवारणी केल्यास पिकावरील दवाचा दुष्परिणाम कमी होतो.
* कीडनाशक किंवा बुरशीनाशक फवारणी सकाळी उशिरा किंवा दुपारी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
