Maharashtra Weather Update : राज्यभरात सध्या थंडीची तीव्र लाट अनुभवायला मिळत असून अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे.(Maharashtra Weather Update)
पहाटे आणि रात्री हुडहुडी भरणारी थंडी वाढली असून पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी वर्गालाही विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)
थंडीची लाट कायम, सकाळी धुक्याची शक्यता
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत राज्यातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, किमान तापमानात पुढील ७ दिवस कोणताही मोठा बदल होणार नाही.
काही भागांत सकाळच्या वेळेत विरळ धुके पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गुजरातमध्ये किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज असून त्याचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावरही जाणवू शकतो, असे हवामान विभागाने कळविले आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान
गेल्या 24 तासांत राज्यातील विविध शहरांमध्ये नोंदवलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे आहे.
मुंबई (सांताक्रूझ) १६.०°C, मुंबई (कुलाबा) २०.२°C, गोंदिया ८.०°C, अहिल्यानगर ७.३°C, नाशिक ७.४°C, पुणे ८.३°C, बीड ८.५°C, नागपूर ८.५°C, मालेगाव ८.०°C.
राज्यातील सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे ७.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
आजचा विभागनिहाय हवामान अंदाज
* कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
* मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील
* मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
* विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
२० डिसेंबरनंतर हवामानात बदलाचे संकेत
हवामान विभागाने राज्यातील ८ जिल्ह्यांना शीतलहरींचा इशारा दिला आहे. २० डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहील, त्यानंतर मात्र किमान आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच २० डिसेंबरनंतर राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून हवामानात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
आरोग्य व शेतीसाठी खबरदारी आवश्यक
सतत बदलणाऱ्या हवामानामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे साथीचे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, उबदार कपडे वापरावेत. तर शेतकऱ्यांनी पिके व पशुधन थंडीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन हवामान तज्ज्ञांनी केले आहे.
