Maharashtra Weather Update : राज्यात हिवाळा येण्याआधीच परत गेल्यासारखे वाटू लागले आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमान वाढू लागले असून ढगाळ वातावरण, उकाडा आणि दमट परिस्थिती यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. (Maharashtra Weather Update)
हिवाळ्याच्या हंगामात अचानक वाढलेले तापमान आणि पावसाचे संकेत यामुळे वातावरण अगदी गोंधळलेलं दिसत आहे.(Maharashtra Weather Update)
देशभरात दोन कमी दाबाचे पट्टे सक्रिय
IMD ने दिलेल्या माहितीनुसार सध्या मलेशिया किनाऱ्याजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्येस आणि श्रीलंकेच्या दक्षिणेस दुसरा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने या दोन प्रणालींचा थेट परिणाम दक्षिण भारत, पश्चिम किनारपट्टी आणि अरब सागरावर दिसत असून वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातून थंडी हद्दपार?
उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग कमी झाल्यामुळे महाराष्ट्रात तापमानात चांगलीच वाढ झाली आहे.परंतु सध्याची स्थिती पाहता धुळे, निफाडसह नाशिक पट्ट्यात किमान तापमान १४°C पेक्षा जास्त आहे.
मुंबई–पुण्यात दुपारचा उकाडा प्रचंड, आणि हा उष्मा सायंकाळपर्यंत कायम आहे. कोकणात दमट हवेमुळे आर्द्रता वाढली, त्यामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तासांतही तापमान कमी होण्याची शक्यता नाही, असे सांगितले आहे.
राज्यात ढगाळ वातावरण कायम
IMD च्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.
कोकणाच्या अंतर्गत भागात, मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात आकाश अंशत: ढगाळ राहील.
या ढगाळ स्थितीमुळे वातावरण दमट जाणवेल.
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर येथे सकाळ उबदार तर दुपार उकाड्याची आणि संध्याकाळी दमट हवामान अशी स्थिती राहणार आहे.
देशभर पारा वाढला
हिमालयातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग कमी झाल्याने हिमाचल, उत्तराखंड, जम्मू–काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान या सर्व राज्यांत तापमान पुन्हा वाढले आहे. धुकं कायम असलं तरी गारठ्यात लक्षणीय घट झाली आहे. हीच स्थिती पुढील ३–४ दिवस कायम राहणार आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* ढगाळ वातावरण, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग वाढलेला असल्याने कीडनाशक/बुरशीनाशक फवारणी करू नये. फवारणीचा परिणाम कमी होतो आणि खर्च वाढतो.
* काढणी केलेला माल सुरक्षित ठेवा, असा सल्ला देण्यात आला आहे.
