Maharashtra Weather Update : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच हवामानात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाचे नवे सत्र सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० मार्चपासून ते ४ एप्रिलदरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील चार दिवस विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)
कुठे कसा राहणार परिणाम?
३० मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वारे, पाऊस आणि ठिकठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही वातावरणात बदल होऊन हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
३१ मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी वातावरण पूर्णपणे स्थिर राहणार नाही. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरूच राहू शकतो.
मात्र १ ते ४ एप्रिलदरम्यान पुन्हा एकदा वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट यांचा धोका अधिक राहण्याची शक्यता आहे.
शेती पिकांसाठी धोका वाढला
राज्यात सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यास काढणी केलेल्या तसेच उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. विशेषतः गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होत असताना शेतात किंवा उघड्यावर थांबणे टाळावे. झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये. पाळीव जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
सतर्क राहा
पुढील चार दिवस हवामान अस्थिर राहणार असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे नियोजित करावीत. वेळेवर घेतलेली खबरदारी मोठे नुकसान टाळू शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* काढणी केलेले पीक मोकळ्या जागेत न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवा
* पिकांवर ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादन वापरा
* शेतातील निचऱ्याची व्यवस्था व्यवस्थित ठेवा
* वादळी वाऱ्यामुळे झाडे/पिके पडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करा
* विजेपासून सुरक्षित राहा
