Maharashtra Weather Update : जानेवारी महिन्याची सुरुवात होताच राज्यासह देशभरात हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. (Maharashtra Weather Update)
एकीकडे उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि धुक्याचा प्रचंड प्रभाव दिसत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा धोका आणि तापमानातील चढ-उतार नागरिकांची चिंता वाढवत आहेत.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा आणि थंडीच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे हवामानात बदल होत असून, राज्यात पुढील काही दिवस किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
वर्षाच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर वातावरण अधिक अस्थिर झाले आहे.(Maharashtra Weather Update)
किमान तापमानात चढ-उतार
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. पुणे शहरात थंडीचा प्रभाव वाढला असला, तरी पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमान स्थिर राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. संपूर्ण जानेवारी महिन्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज असून, काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
राज्यात आजही अनेक भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून ९.८ अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदविण्यात आलं आहे. अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तर भारतात पावसाचा इशारा
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, ६ जानेवारी रोजी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू–काश्मीर या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील तब्बल १५ जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा धोकादायक इशारा जारी करण्यात आला असून, किमान तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
राज्यातील हवामानाचा अंदाज
कोकण विभागात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळच्या सुमारास हलके धुके जाणवू शकते.
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर काहीसा कमी झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुणे शहरात पहाटे धुक्याची स्थिती राहणार असून नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इतर जिल्ह्यांतही अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभागात हवामान प्रामुख्याने निरभ्र राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून, थंडीचा प्रभाव तुलनेने कमी राहील, असा अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
विदर्भ विभागात सकाळच्या वेळेत धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* राज्यात ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाची शक्यता, थंडी व पहाटेचे धुके लक्षात घेता शेतकऱ्यांनी पुढील काळात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
* कापणीस तयार असलेली पिके (हरभरा, गहू, भाजीपाला) शक्य असल्यास तात्काळ काढणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
