Maharashtra Weather Alert : नोव्हेंबरअखेरीस थंडीचा जोर वाढण्याऐवजी राज्यात ढगाळ वातावरण, तापमानवाढ आणि पावसाची शक्यता वाढताना दिसत आहे.(Maharashtra Weather Alert)
बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या नव्या हवामान प्रणालीमुळे राज्यात तापमानात चढ-उतार तर दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या प्रणालीमुळे चक्रीवादळासारखी स्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविली असून, पुढील दोन दिवस हे हवामान बदल अधिक तीव्र होऊ शकतात.(Maharashtra Weather Alert)
बंगालच्या उपसागरात नवी प्रणाली
मलेशिया आणि स्ट्रेट ऑफ मलक्का परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानाचे नवे चक्र सुरू झाले आहे. हा पट्टा पश्चिम व उत्तर-पश्चिम दिशेने सरकत असून, येत्या २४ तासांत अंदमान समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून पुढील ४८ तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याचा धोका वाढला, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ही प्रणाली सक्रिय झाल्यास दक्षिण भारतासह महाराष्ट्रावरही पावसाचा परिणाम दिसून येईल.
ढगाळ वातावरण
गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारी कडाक्याची थंडी ओसरली असून तापमानात स्पष्ट वाढ झाली आहे. राज्यातील किमान तापमान ७–८ अंशांवरून थेट १२.८ अंशांवर, काही भागात तर १४ अंशांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे सकाळ-संध्याकाळची गारठा कमी झाला असून, किनारपट्टी भागात आर्द्रता वाढली आहे.
या भागात तुरळक सरींची शक्यता
राज्यातील ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलका पाऊस व ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पावसाचे कारण नेमके काय?
कोमोरिन क्षेत्रावर चक्रीवादळसदृश्य स्थिती विकसित होत असून, दक्षिण-पश्चिम बंगालची खाडी श्रीलंका आणि तमिळनाडू लगतचे समुद्रक्षेत्र यावर व्यापक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अधिक तीव्र होत दक्षिण भारतावर परिणाम करणार आहे.
दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा
IMD ने या नव्या प्रणालीवर स्पष्ट इशारा जारी केला आहे,
तमिळनाडू : २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान मुसळधार पाऊस
केरळ : २६ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा
लक्षद्वीप, अंदमान-निकोबार : पुढील ५ दिवस पावसाची शक्यता
मासेमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे, तर नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थंडीऐवजी पावसाचं संकट
हवामानातील ही अनिश्चितता काही दिवस कायम राहण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात थंडीचा जोर येण्यास विलंब होणार असून, ढगाळ वातावरण व किंचित पाऊस पुढील दोन दिवस टिकू शकतो. त्याचवेळी दक्षिण भारतासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* वारा-पावसामुळे भोपळा, काकडी, वेलवर्गीय पिकांना आधार द्या.
* टोमॅटो, वांगी या पिकांवर ताडपत्री किंवा नेट लावून संरक्षण द्या, असा सल्ला देण्यात आला आहे.
