Maharashtra Cold Alert : राज्यात डिसेंबर महिन्याची सुरुवातच थंडीच्या लाटेसह झाली असून पुढील काही दिवस राज्यभर गारठा जाणवणार आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, ३ डिसेंबरपासून थंडी वाढण्याचा इशारा देत काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Cold Alert)
उत्तरेकडून येणाऱ्या गार वाऱ्यांचा प्रभाव आणि दक्षिण भारतातील सक्रिय चक्रीवादळामुळे राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (Maharashtra Cold Alert)
कोकण विभागात कोरडे हवामान सुरूच
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. तापमान अन्य भागांच्या तुलनेत थोडे जास्त असले तरी सकाळ-संध्याकाळी गारठा कायम राहणार आहे. रत्नागिरीत कमाल तापमान ३३°C नोंदले गेले आहे.
मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक थंडीचा फटका
धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि घाटमाथ्यावर थंडीची तीव्रता वाढली असून या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पारा घसरला
धुळे येथे ७°C, निफाड येथे ८.९°C, परभणी येथे ९.८°C, जेऊर, अहिल्यानगर आणि भंडारा येथे पारा १०°C खाली उर्वरित सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्येही गारठा वाढत असून रात्री तापमानात लक्षणीय घट दिसून येत आहे.
मराठवाड्यात गारठा वाढणार
छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये आकाश निरभ्र राहील. हवेतल्या कोरडेपणामुळे रात्रीचे तापमान अचानक खाली घसरण्याची शक्यता आहे. धुके, दवबिंदू आणि गारठ्याची स्थिती पुढील दोन दिवस अधिक तीव्र होणार आहे.
विदर्भात थंडीची लाट
विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळमध्ये ढगाळ वातावरणाचे संकेत मिळत आहेत. काही भागांत कोल्ड वेव्हसारखी स्थिती निर्माण होऊ शकते.
देशभरातील हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावर
तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि लक्ष्यद्वीपवर समुद्री चक्रीय वाऱ्यांमुळे पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर भारतात काश्मीर, हिमाचल, उत्तराखंड मध्ये बर्फवृष्टी, तर पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि यूपीमध्ये घनदाट धुके आणि थंडीची लाट यामुळे थंड वाऱ्यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे सरकत असून राज्यातील तापमान झपाट्याने कमी होत आहे.
चक्रीवादळ 'हिटवाह'चे अवशेष सक्रिय
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हिटवाह चक्रीवादळ पूर्णपणे निवळले असले तरी त्याचे उरलेले अवशेष तामिळनाडू–आंध्र किनाऱ्यावर सक्रिय आहेत. चेन्नईच्या ४० किमी पूर्वेस कमी दाबाचा क्षेत्र टिकून असून पुढील काही तासांत त्याची तीव्रता कमी होणार आहे.
राज्यात आणखी दोन दिवस गारठा
पुढील ४८ तास महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाचे आवाहन
* पहाटे व रात्री बाहेर पडताना काळजी घ्यावी
* वृद्ध, लहान मुले आणि शेतकरी यांनी विशेष खबरदारी घ्यावी
* सकाळच्या दवामुळे वाहनधारकांनी सावधगिरी बाळगावी
शेतकऱ्यांना सल्ला
* रब्बी पिकांमध्ये दव-हानीपासून बचाव करा.
* कडधान्ये व हरभऱ्यांमध्ये दवामुळे पानांवर बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्यता आहे.
* सकाळी लवकर शेतात फिरणे टाळा.
* गरजेनुसार ट्रायकोडर्मा सारख्या प्रतिबंधात्मक फवारणीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
