Latur Awakali Rain : लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Latur Awakali Rain) पुन्हा एकदा कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे रेणापूर, जवळगा आणि खरोळा ही तीन बॅरेजेस भरून तुडुंब झाली असून प्रशासनाने १४४१ क्युसेक पाणी रेणा नदीपात्रात सोडले आहे.
यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.
लातूर जिल्ह्यातील (Latur Awakali Rain) हवामान गेल्या आठवड्याभरापासून सतत हवामानात बदल होत आहे. दररोज वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस होत आहे.
मंगळवारी रात्री रेणापूर तालुक्यात जोरदार पावसामुळे तीन बॅरेजेस पूर्णपणे भरली आणि पाण्याची पातळी धोकादायक ठरताच प्रशासनाने २ मीटर दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडले.
रेणापूर, औराद शहाजानी, उस्तुरी, येरोळ भागात पावसाचा जोर अधिक असल्याचे प्रशासनाने सांगितले. साकोळ येथील काही कुटुंबांच्या घरांवरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले, तर आंब्याच्या बागांनाही मोठे नुकसान झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर कायम असून हिमायतनगर, उमरी, नायगाव, धर्माबाद या तालुक्यांत गुरुवारीही मुसळधार पाऊस पडला. विजा पडल्याने जनावरे दगावल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.
परभणीत गंगाखेड, चुडावा, येलदरी परिसरात पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजांमुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, शेतमाल व उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
रेणापूर तालुक्यातील तीन बॅरेजेसमधून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे.- श्रीनाथ कुलकर्णी, शाखा अभियंता
हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi Dam: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता: सिंचनाचा मार्ग मोकळा! वाचा सविस्तर