Cold Wave in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढताना दिसत असून, धुके आणि गारठ्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे.IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, आज (१७ डिसेंबर) रोजी संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यतः स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.(Cold Wave in Maharashtra)
मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या सर्वच विभागांमध्ये सकाळी व रात्री धुक्याचा प्रभाव जाणवणार आहे.(Cold Wave in Maharashtra)
कोकण विभागात थंडी कायम, काही भागांत दाट धुके
कोकणात डिसेंबर महिन्यात थंडी कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यांमध्ये १७ डिसेंबर रोजी थंडी जाणवणार असून, हवामान कोरडे राहील. काही ठिकाणी सकाळी दाट धुकं पडण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात सकाळी धुके, रात्री गारठा
मध्य महाराष्ट्रात, विशेषतः पुणे शहर व परिसरात सकाळी धुके राहण्याची शक्यता आहे. या विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळेला थंडी अधिक जाणवेल. तापमानात फारसा बदल नसला, तरी हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यात तापमानात चढ-उतार, थंडीपासून सावध राहा
मराठवाडा विभागातही कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानात काही प्रमाणात चढ-उतार जाणवू शकतो. हवामान विभागाने नागरिकांना रात्री थंडीपासून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
विदर्भात गारठा कायम, मोठा बदल नाही
विदर्भात पुढील २४ तासांत हवामान कोरडे राहील. तापमानात फारसा बदल अपेक्षित नसला, तरी सकाळी व रात्री थंडीचा प्रभाव कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात कुठे सर्वाधिक थंडी?
सध्या निफाड आणि धुळे येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद होत असून, किमान तापमान ५.५ ते ६.८ अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट नसली, तरी गारठा कायम असल्याने अनेक भागांत शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत.
घाटमाथ्यावर धुक्याची दाट चादर
उत्तर महाराष्ट्रात थंडी अधिक जाणवणार असून, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील भागांमध्ये याचा मोठा परिणाम होणार असल्याने वाहनचालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोकणातील थंडीचा हापूस आंब्याला फायदा
कोकणातील सध्याचं हवामान हापूस आंब्यासाठी पोषक ठरत आहे. रात्रीची थंडी आणि दिवसा कडक ऊन यामुळे आंबा मोहरासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असल्याचं बागायतदार सांगतात.
मागील काही महिन्यांतील हवामान बदलामुळे चिंतेत असलेले हापूस उत्पादक शेतकरी सध्या समाधान व्यक्त करत आहेत.
कडाक्याच्या थंडीत पावसाचाही अंदाज
देशपातळीवर पाहता, कडाक्याची थंडी आणि धुक्याबरोबरच पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
IMD दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात १७ ते २० डिसेंबरदरम्यान धुके आणि पावसाची शक्यता आहे तर तेलंगणा व अंतर्गत कर्नाटकात शीतलहरीसदृश स्थिती जाणवेल. दक्षिण आसाम परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली असून १७ डिसेंबरच्या रात्रीपासून हिमालयीन भागात पश्चिमी झंझावात सक्रिय होणार असल्याचे कळवले आहे.
दरम्यान, तामिळनाडू तसेच अंदमान-निकोबार बेटसमूहात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सूचना
सकाळी व रात्री थंडीपासून काळजी घ्या
धुक्यामुळे वाहन चालवताना वेग कमी ठेवा
वृद्ध, लहान मुले व आजारी व्यक्तींनी विशेष खबरदारी घ्यावी
शेतकऱ्यांना सल्ला
* थंडी व धुके काळात रब्बी पिकांची काळजी घ्या.
* पाणी व्यवस्थापनावर भर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
