Join us

Jihe Kathapur Yojana : जिहे-कठापूर योजनेला धोम बलकवडी धरणातून सोडलेले पाणी बंद होणार? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:32 IST

Jihe Kathapur Yojana धोम धरणातून कृष्णा नदीपात्रातून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी त्वरित बंद करावे.

पिंपोडे बुद्रुक : धोम धरणातून कृष्णा नदीपात्रातून जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी त्वरित बंद करावे.

अशी मागणी धोम धरण संघर्ष समितीने निवेदनाद्वारे सातारा सिंचन तसेच प्रकल्प महामंडळाकडे केल्याची माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष रणजीत फाळके यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे की, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी धोम धरण पाणी वाटपाबाबत मार्चमध्ये बैठक घेऊनच पाणी वाटपाचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असले तरी सद्यस्थितीत नियमबाह्य जिहे कठापूर योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे.

मुळात जिहे कठापूर योजना ही चारमाही केवळ खरीप हंगामासाठी असून, त्यास अनुसरून पावसाळ्यात वाहून जाणारे ३.१७ टीएमसी पाणी दुष्काळी भागासाठी चारमाही योजनेतून देणे आहे. त्या योजनेला पाणी साठवण टँक कोठेही नाही.

तरी त्या योजनेला खरीप हंगामात सोडण्यासाठी धोम बलकवडी धरणातून ०.५३ टीएमसी पाण्याची तरतूद केलेली आहे. त्याचा वापर फक्त खरीप हंगामात देण्यासाठी आहे. महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणच्या नियमानुसार जिहे-कठापूर योजना ही चारमाहीच आहे.

त्यामुळे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी जिहे कठापूर योजनेला धोम बलकवडी धरणातून पाणी सोडता येणार नाही, असे महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणच्या दि. ९ एप्रिल २०१९च्या निकालपत्रात नमूद केलेले आहे.

त्यानुसार या योजनेला धोम बलकवडी धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामात पाणी सोडण्यात येऊ नये, तसे झाल्यास महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणच्या नियमांचे उल्लंघन होणार आहे. यावेळी अध्यक्ष चंद्रकांत बर्गे, कार्याध्यक्ष रणजीत फाळके, पाणी वापर संस्था सचिव नंदकुमार पाटील उपस्थित होते.

आदेश भंगप्रकरणी न्यायालयात जाणारजलसंपदा विभागाच्या या निर्णयामुळे धोम धरण लाभक्षेत्रातील शेतीवर परिणाम होणार आहे. कार्यवाही न केल्यास महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरण आदेशाचा भंगप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल तसेच शेतकऱ्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आंदोलनचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

अधिक वाचा: Ujani Dam Water Level : उजनीतून ६ हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सुरू; सध्या धरणात किती पाणीसाठा?

टॅग्स :धरणपाणीपाटबंधारे प्रकल्पशेतीशेतकरीपीकखरीपरब्बीरब्बी हंगामराज्य सरकारनदीदुष्काळ