शिराळा : शिराळा तालुक्यात सलग चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाल्याने लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे.
त्यामुळे गेले अनेक महिने कोरडे पडलेले ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. चांदोली पाणलोट क्षेत्रात पाथरपुंज येथे १०६ मिमी व निवले येथे १०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शिराळ्यात बुधवारी व गुरुवारी कोकरूड परिसरात अतिवृष्टी झाली होती. शुक्रवारी दिवसभर पावसाने सुरुवात केली असून, सायंकाळी पावसाचा जोर वाढला आहे.
तालुक्यात सर्वत्र या पावसाने सुरुवात केल्याने पेरणी पूर्व मशागत चांगल्या होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव झाली.
शिराळ्यात अनेक ठिकाणी नाल्यांतील पाणी रस्त्यावर वाहत आहे. चरण येथे कोकरूड-चांदोली या मुख्य रस्त्यावर असणारे झाड पावसामुळे झुकल्याने मोठी वाहने जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. ते झाड काढण्यात आले आहे.
खुजगाव येथे शेतातील बांध फुटून माती व मुरूम कोकरूड-शेडगेवाडी या मुख्य रस्त्यावर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. जेसीबीच्या साहाय्याने मुरूम-माती बाजूला करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
तालुक्यातील पाझर तलावातील पाणीपातळीत वाढ होत आहे. सर्वत्र पावसाने हजेरी लावल्याने चांदोली धरणातील कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. या धरणातून नदीपात्रात ७७६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
चांदोली पाणलोट क्षेत्रातील पाऊस
चांदोली धरण - ४७ (४०८१)
पाथरपुंज - १०६ (८४८०)
निवले - १०५ (६७९०)
चांदोली - ५२ (४०७५)
अधिक वाचा: पिक उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ करायची असेल तर करा या तंत्राने पेरणी