लातूर जिल्ह्यातीलरब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने सिंचनाचे नियोजन जाहीर केले आहे. लातूर पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी या सहा मध्यम प्रकल्पांसह ९८ लघुप्रकल्पांमधून रब्बी हंगामासाठीपाणी सोडले जाणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना या सिंचन सुविधेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज ३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संबंधित शाखा अभियंता कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन उपकार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
रब्बी हंगाम २०२५-२६ करिता शासनाच्या सुधारित नमुना ७ व ७ अ मध्ये आपले अर्ज भरणे गरजेचे आहे. अर्जासोबत जमिनीचा चालू सातबारा उतारा जोडणे अनिवार्य असून, अर्जदार हा जमिनीचा मूळ मालक असावा.
विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांकडे मागील पाणीपट्टीची थकबाकी आहे, त्यांनी ती त्वरित भरून रीतसर पावती घ्यावी; थकबाकी भरल्यानंतरच नवीन पाणी अर्ज मंजूर केला जाईल. पाणी मागणीचे क्षेत्र किमान ०.२० आर. किंवा त्याच्या पटीत असणे आवश्यक आहे.
पिकांची निवड : शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. उसासारख्या बारमाही पिकांना वर्षभर पाणी मिळेलच, याची शाश्वती नसल्याने अशा पिकांची लागवड करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
शेतचाऱ्यांची दुरुस्ती : आपल्या हद्दीतील शेतचाऱ्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याची असेल. शेतचारी नादुरुस्त असल्यास पाणीमंजुरी दिली जाणार नाही.
दंडात्मक कारवाई : विनापरवाना पाणी घेतल्यास किंवा मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त सिंचन केल्यास दीडपट पाणीपट्टी आणि दंडात्मक आकारणी केली जाईल. तसेच कालव्याचे गेट जबरदस्तीने उघडणे किंवा कालवा फोडणे यांसारख्या प्रकारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
०.२० आर क्षेत्र शेतकऱ्यांकडे असणे बंधनकारक
मागील थकबाकी पूर्ण भरणाऱ्या शेतकऱ्यांनाच रब्बी हंगामात पाणी दिले जाणार आहे. कमीत कमी २० आस्च्या पटीत क्षेत्र असणे आवश्यक आहे. पाणी अर्ज मंजूर झाल्यानंतर पिकास पाणी दिले जाईल. आपापल्या हद्दीतील शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.
उपसा सिंचन धारकांसाठी सूचना
• ज्या शेतकऱ्यांकडे उपसा सिंचन परवाना आहे, त्यांनी ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसारच पाणी घ्यावे. विहित मुदतीनंतर पंप सुरू आढळल्यास सिंचन अधिनियम १९७६ नुसार वीजपुरवठा खंडित करणे किंवा मोटर जप्त करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
• जास्तीत जास्त लाभधारकांनी अधिकृतरीत्या पाणी परवाने घेऊनच सिंचन करावे, जेणेकरून प्रशासनाला पाण्याचे योग्य नियोजन करता येईल, असे आवाहन कार्यकारी अभियंता रो. सु. जगताप यांनी केले आहे.
कालव्यावरील उपसा सिंचन परवाने...
कालव्यावरील उपसा सिंचन परवाना धारकाने त्यांच्या मंजूर क्षेत्रास ठरवून दिलेल्या तारखेस पाणी कालव्याच्या शेवटापासून ते सुरुवात याप्रमाणे घ्यावे. सिंचन नियोजन असल्यास मंजूर कालावधी सोडून कृषी पंप चालू ठेवल्यास आधी नियम १७६ चे कलम ९७ नुसार विद्युत पुरवठा खंडित करणे, विद्युत मोटारी जप्त करणे, पाणी परवाने रद्द करणे ही कारवाई होईल.
