गत काही दिवसांत अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांतील जलसाठा वाढला आहे. सध्या चार मोठ्या प्रकल्पांसह एकूण २३ प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.
शुक्रवार, २९ ऑगस्ट रोजी अमरावती विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे पाच दरवाजे २० सेंटिमीटरने उघडले आहेत. या धरणामधून १६.०५ क्युमेस इतका विसर्ग सुरू आहे. वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
विभागातील एकूण ९ मोठ्या प्रकल्पांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पाचे दरवाजे ३१ सेंटिमीटरने उघडण्यात आले आहे. यामधून ८०.१० क्युमेक विसर्ग सुरू आहे. बेंबळा प्रकल्पाची दोन दारे १० सेंटिमीटरने उघडली आहेत. यामधून १६ क्युमेक विसर्ग सुरू आहे.
पेनटाकळी प्रकल्पाचे दरवाजे करण्यात आले बंद
अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. खडकपूर्णा प्रकल्पाच्या ३ दारांमधून २०४.६९ क्युमेक विसर्ग सुरू आहे.
एकूण २७ मध्यम प्रकल्पापैकी अमरावती जिल्ह्यातील शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, मोर्णा, घुंगशी बॅरेज, वाशीम जिल्ह्यातील अडाण, सोनल, एकबुर्जी, ज्ञानगंगा, बुलढाणा जिल्ह्यातील कोराडी, मन आणि उतावळी या प्रकल्पांमधून सध्या पाणी सोडले जात आहे.
सर्व प्रकल्पांमध्ये ८०.६७ टक्के जलसाठा
मध्यम प्रकल्पांत ६१४.८० दलघमी म्हणजे ७९.६७ टक्के, तर लघु प्रकल्पांमध्ये ७१७.३२ दलघमी म्हणजे ७७.०७ टक्के जलसाठा झाला आहे. विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये २५०२ दलघमी (८०.६७ टक्के) साठा झाला.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र