उष्णतेच्या लाटेत संपूर्ण विदर्भ होरपळून निघत आहे. रविवारी तर विदर्भात सूर्य कोपला की काय, असेच चित्र पाहायला मिळाले. विदर्भातील सर्वच प्रमुख शहरांचे तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवले गेले.
देशातील सर्वाधिक तापमान अकोला शहरात ४६.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान आहे.
अकोल्यापाठोपाठ सर्वाधिक तापमान नोंदविलेल्या शहरांमध्ये अमरावतीचा दुसरा क्रमांक आहे. मराठवाड्यात रविवारी छत्रपती संभाजीनगरचे तापमान ४३.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
सातत्याने देशातील सर्वाधिक तापमान अकोला व विदर्भातील काही प्रमुख शहरांमध्ये नोंदविले जात आहे. रविवारी तर या उन्हाळ्यातील तापमानाचा उच्चांक गाठला गेला. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास या दशकातील तापमानाचा उच्चांक मोडण्याची शक्यता आहे.
गत तीन वर्षातील रेकॉर्ड मोडणारे मराठवाड्यातील तापमान
परभणी - ४३.७°
छ. संभाजीनगर - ४३.४°
नांदेड - ४२.५°
बीड - ४१.०°
जालना - ४१.०°
आज उष्णतेची लाट
सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत संपूर्ण विदर्भात प्रचंड उष्णता जाणवणार असून, विदर्भासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी उष्णतेची लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
विदर्भातील रविवारचे तापमान
अकोला - ४६.९०°
अमरावती - ४६.८०°
वर्धा - ४६.४०°
यवतमाळ - ४६.००°
नागपूर - ४५.४°
चंद्रपूर - ४५.००°
वाशिम - ४४.६०°
गडचिरोली - ४४.६०°
गोंदिया - ४४.४°
ब्रह्मपुरी - ४४.२०°
बुलढाणा - ४३.५°
हेही वाचा : उन्हात काम करत असाल तर काळजी घ्या; हृदय अन् किडनीवर येतोय ताण
