राज्यातील एकूण तीन हजार धरणांमध्ये सुमारे ६५३.६३ टीएमसी पाणीसाठा (४३.८७ टक्के) उपलब्ध असून गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १०१.७७ टीएमसी जादा पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हा साठा ५५१.८६ टीएमसी (३७.२४ टक्के) होता.
पुणे विभागात सर्वाधिक २०६ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, सर्वांत कमी ६१ टीएमसी पाणीसाठा कोकण विभागात उपलब्ध आहे. यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.
त्यामुळे टंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात २०१४ मध्ये १२ टक्के तर २०१५ मध्ये सुमारे १४ टक्के घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती.
विभागनिहाय पाणीसाठा (आकडे टीएमसीमध्ये)
| विभाग | यंदाचा साठा | गेल्यावर्षीचा साठा |
| कोकण | ६१.२४ | ६२.९२ |
| अमरावती | ७३.७२ | ६५.१३ |
| नागपूर | ८०.७९ | ६३.४० |
| नाशिक | १०१.९६ | ८९.२८ |
| छत्रपती संभाजीनगर | १२९.३७ | ९७.०९ |
| पुणे | २०६.५५ | १७४.०४ |
यावर्षी साडेसहा टक्के जादा साठा
१५ ऑक्टोबर २०१४ रोजी ८७२ टीएमसी तर याच दिवशी २०१५ ला ६२५ टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत २०२५ मध्ये १५ ऑक्टोबरला १३३०.९७ टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा २१ एप्रिल रोजी ६५३.६३ टीएमसी आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे १०१.७७ टीएससी पाणीसाठा अधिकचा आहे. त्यानुसार राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्टअखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्यासाठी काटकसरीचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा : गोड पेक्षाही अधिक धोकादायक आहेत 'ही' तुमच्या मधुमेहाची खरी कारणे
