पश्चिम विदर्भातील सर्व धरणे तुडुंब भरली आहेत. जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार विभागातील एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांपैकी चार मोठ्या आणि ११ मध्यम प्रकल्पांमधून अजूनही विसर्ग सुरू आहे. उर्वरित धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या नऊ मोठ्या प्रकल्पांत १३९९.२२ द.ल.घ.मी. म्हणजेच ९९.९५ टक्के पाणीसाठा आहे.
विभागातील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण १०० टक्के भरले आहे. या धरणामध्ये ५६४.०५ द.ल.घ.मी. साठा झाला आहे. धरणाच्या एका दरवाजातून ८ क्युमेक विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि वान प्रकल्प वगळता अन्य सर्व धरणांमध्ये शंभर टक्के जलसाठा झाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पात १८३.९४ द.ल.घ.मी., यवतमाळ जिल्ह्यातीलच पूस प्रकल्पात ९१.२७द.ल.घ.मी., अरुणावती प्रकल्पात १६९.६७द.ल.घ.मी., अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात ८५.७५ द.ल.घ.मी., वान प्रकल्पात ८१.८६ द.ल.घ.मी., बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात ६९.३२, पेनटाकळी प्रकल्पात एकूण ५९.९७ द.ल.घ.मी., खडकपूर्णा प्रकल्पात ९३.४० द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला आहे.
अमरावती विभागातील एकूण २७ मध्यम प्रकल्पांपैकी २२ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. उर्वरित मध्यम प्रकल्पांमध्येही समाधानकारक पाणीसाठा आहे. अमरावती जिल्ह्यातील चंद्रभागा, पूर्णा आणि सपन प्रकल्पात शंभर पाणीसाठा आहे.
शहानूर प्रकल्पात ९४.५३ टक्के पाणीसाठा झाला आहे. पंढरी, बोर्डी नाला प्रकल्पांत ३० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी बोरगाव आणि नवरगाव या सहाही मध्य प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
१०० टक्के
जलसाठा अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा आणि वान प्रकल्प वगळता अन्य सर्व धरणांमध्ये झाला आहे.
अकोला, वाशिम, बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पही तुडुंब
• अकोला जिल्ह्यातील घुंगशी गॅरेज प्रकल्प वगळता इतर सर्व प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात निगुर्णा, मोर्णा आणि उमा या प्रकल्पांचा समावेश आहे.
• वाशिम जिल्ह्यातील अडान सोनल आणि एकबुर्जी या प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे.
• बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा, पलढग, मस, कोरडी, मन, तोरणा आणि उतावळी या सात मध्यम प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
• अमरावती विभागातील अप्पर वर्धा, पूस, पेनटाकळी आणि खडकपूर्णा यांसह १३ प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे.
असा आहे विभागातील जलसाठा
• ९९.९५ टक्के - मोठ्या प्रकल्पांमध्ये १३९९.२२ द.ल.घ.मी.
• ८८.६३ टक्के - मध्यम प्रकल्पांमध्ये ६८३.९८ द.ल.घ.मी.
• ९३.९८ टक्के - लघु प्रकल्पांमध्ये ८७१.०२ द.ल.घ.मी.
