टेंभुर्णी : परतीचा मुसळधार पावसामुळे उजनी परिसरात रविवारी रात्रीत चक्क ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने उजनीतून एक लाख क्युसेक विसर्ग भीमा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी हा विसर्ग वाढवण्यात आला. मात्र रात्री १० नंतर विसर्गात घट करुन ९० हजार क्युसेक एवढा विसर्ग ठेवला आहे. भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या दौंड येथून देखील विसर्गात मोठी वाढ झाली आहे. ३४ हजार क्युसेक विसर्ग उजनीत मिसळत आहे. गेल्या दोन दिवसात उजनी पाणलोट क्षेत्रात १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
शनिवारी २७ मिलिमीटर पाऊस झाल्याने पाणी पातळी वाढली होती. यामुळे रविवारी रात्रीपासून उजनीतून भीमा नदीत विसर्ग वाढला होता.
रविवारी पुन्हा रात्रभर ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने उजनीची पातळी ११० टक्केपर्यंत गेली होती. सोमवारी मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आल्याने सायंकाळी पाणी पातळी कमी होऊन १०७.८५ टक्के झाली होती.
सध्या उजनी पूर्ण क्षमतेने भरले आहे. १११ टक्के उजनीची क्षमता आहे. पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरण व्यवस्थापन प्रयत्न करत आहे. खडकवासला येथून ६ हजार क्युसेक, तर बंडगार्डन येथून १७ हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
१ जूनपासून उजनी परिसरात ५२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चालू पावसाळ्यातील सरासरी पूर्ण झाली आहे. सध्या उजनी धरणात १२१.४४ टीएमसी पाणीसाठा असून, ५७.७८ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
सर्व १९ धरणं भरली◼️ भीमा खोऱ्यातील माणिकडोह धरण (६९ टक्के) वगळता, उजनीवरील सर्व १९ धरणं शंभर टक्के भरली आहेत.◼️ नीरा खोऱ्यातील देखील पाचही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत.◼️ पावसाळा आणखी एक महिना शिल्लक असल्याने नीरा नृसिंहपूर येथून पुढील नदीकाठच्या गावांना पुराची धास्ती लागून राहिली आहे.
वीर धरणातून निरा नदीत १७,१११ क्युसेक विसर्ग◼️ निरा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निरा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.◼️ या पार्श्वभूमीवर वीर धरणातून निरा नदीत १७,१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.◼️ यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.◼️ गेल्या २४ तासांपासून निरा खोऱ्यात संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणामधील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर आहे.◼️ धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.