यंदा मुबलक पाऊस झाला असून, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुस्थितीत असलेल्या जवळपास ५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांना नुकतेच गेट बसवून पाणी अडवण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये तब्बल ५० हजार सहस्त्र घनफूट (टीसीएम) पाणी अडले असून, परिसरातील साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी याचा फायदा होणार आहे.
कार्यकारी अभियंता कपिल बिडगर यांनी सांगितले की, जिल्ह्यात ५८५ कोल्हापुरी बंधारे असून, त्यामध्ये एकूण पाणीसाठ्याची क्षमता ६७ हजार १७५ सहस्त्र घनमीटर आहे. मात्र, यंदा झालेल्या अतिवृष्टीमध्ये ६४ बंधारे वाहून गेले, तर १२ बंधारे नादुरुस्त झाले. त्यामुळे नुकतेच सुमारे ५०० कोल्हापुरी बंधाऱ्यांचे गेट बंद केल्यामुळे त्यात ५० हजार सहस्त्र घनफूट एवढे पाणी अडले आहे.
साधारणपणे दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत (साधारण १५ तारखेपर्यंत) बंधाऱ्यांना गेट बसवून पाणी अडवले जाते; पण पाण्याची आवक जास्त असल्याने नोव्हेंबरच्या १५ ते २० तारखेपर्यंत पाणी अडवणे शक्य नव्हते. तशाही परिस्थितीत गेट टाकून बंधाऱ्यांत पाणी अडवण्यात आले असते, तर बाजूचा भराव वाहून जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाले असते.
यामुळे शेतकरी तसेच ग्रामपंचायतींनी सावध पवित्रा घेत पाण्याची आवक जशी कमी होईल, तसे टप्प्याटप्प्याने बंधाऱ्यांना गेट बसवले आहेत. विशेष म्हणजे, गेट बसवण्यात आल्यामुळे सिल्लोड, वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर तालुक्यांतील बंधाऱ्यांमध्ये सर्वाधिक पाणी अडले असून, शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.
सिंचनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा
भूजल पातळी वाढवण्याच्या हेतूने कोल्हापुरी बंधाऱ्यांचा उपक्रम अस्तित्वात आला. या माध्यमातून पाणी अडवल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील विहिरींचा जलसाठा वाढतो व शेतकऱ्यांना त्याचा सिंचनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा होतो. आपल्याकडे पाणीवापर संस्था अधिक सक्षम होण्याची गरज आहे. ग्रामपंचायती तसेच परिसरातील लाभार्थी शेतकऱ्यांवर बंधाऱ्यांना गेट बसवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. - कपिल बिडगर, कार्यकारी अभियंता, जि. प. सिंचन विभाग छत्रपती संभाजीनगर.
