भीमा खोऱ्यातील पाऊस घटल्याने उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात मोठी घट झाली आहे. दौंड येथून शनिवारी सायंकाळी १० हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. दौंड येथील घट झाल्याने उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गातदेखील घट झाली आहे. तसेच उजनी शंभर टक्के भरायला आता अर्धा टीएमसी पाण्याची गरज आहे.
उजनीतून भीमा नदीत १० हजारांचा विसर्ग सुरू आहे. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील उजनी पाणलोट क्षेत्र असलेल्या भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्याने दौंड येथील विसर्ग ५५ हजार क्युसेकपर्यंत गेला होता. तर उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने उजनीतून ही ७० हजार क्युसेकपर्यंत भीमा नदीत विसर्ग सोडून देण्यात आला होता. पुढील दोन दिवसांत ५ ऑगस्टपर्यंत उजनी शंभर टक्क्यांपर्यंत भरणार आहे.
सध्या उजनीची पाणी पातळी ९८.२३ टक्के झाली आहे. उजनीत एकूण ११६.२९ टीएमसी पाणीसाठा असून, ५२.६३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उजनी शंभर टक्के भरण्यासाठी केवळ अर्धा टीएमसी पाण्याची गरज आहे.
उजनीतून वीजनिर्मिती १ हजार ६०० क्युसेक, उजनी मुख्य कालवा १ हजार ३०० क्युसेक, भीमा सीना जोड कालव्यातून ४०० क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन योजना १८० क्युसेक तर दहिगाव ८० क्युसेक, असा एकूण १४ हजार ५२० क्युसेक विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे. १ जूनपासून उजनी धरण परिसरात २१५ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.