आयुब मुल्लाखोची: अवघ्या ३० गुंठ्यांत १३ प्रकारचा सेंद्रिय भाजीपाला करत नावीन्यपूर्ण शेती करण्याचा प्रयोग लाटवडे येथील युवा शेतकरी अक्षय व्यंकटराव पाटील यांनी केला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी शेतात पिकविलेल्या भाजीपाल्याचा दर स्वतःच ठरवून विक्री सुरू केली. पहिल्याच आठवड्यात वीस हजारांचा भाजीपाला विकला असून, तीन महिन्यांत २ लाखांहून अधिक उत्पन्न मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.
एम.टेक. झालेल्या अक्षय पाटील यांनी कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारली; परंतु त्यात ते रमले नाहीत. त्यांनी शेतीत लक्ष घातले. रासायनिक खताचा, कीटनाशकांचा वापर वाढत चालला आहे.
आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेती हा उत्तम मार्ग आहे, यादृष्टीने त्यांनी भाजीपाला घेणे सुरू केले.
सुरुवातीच्या तीन प्रयोगांत सहा प्रकारचा भाजीपाला केला. थोडा जास्त त्रास झाला; पण शेतीने नुकसान केले नाही. आता मात्र त्यामध्ये दुप्पट वाढ करून १३ प्रकारचा भाजीपाला केला आहे.
विषमुक्त भाजीपाला शेतीच्या पिकांनी उत्पादन चांगले देणे सुरू केले असून, त्याला प्रतिसाद मिळत आहे. २० हजारांचा भाजीपाला विकला असून, तीन महिन्यांत २ लाखांहून अधिक उत्पन्न मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुपवरून भाजीपाला विक्री कागल, सांगली या ठिकाणी सेंद्रिय भाजीपाला विक्री करणाऱ्यांना शेती मालाचा पुरवठा केला जातो; तसेच वडगाव परिसरात ग्राहकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. त्यावर भाजीपाला दर टाकला जातो. त्यानुसार या ग्रुपवर ग्राहक किती भाजीपाला लागणार आहे, याची मागणी करतात. त्यानुसार घरपोच भाजीपाला पोहोच केला जातो.
दरात बदल नाही१३ व १७ गुंठ्यांचे संलग्न दोन प्लॉट तयार केले आहेत. त्यामध्ये वांगी, दोडका, भेंडी, काकडी, टोमॅटो, गवार, मिरची, कांदा पात, चवळी, कारली, पडवळ, दुधी भोपळा, बीन्स भाजीपाला घेतला जातो. काकडी, टोमॅटो यांचा दर वगळता उर्वरित सर्व भाजीपाला एकाच दराने विकला जातो. हा दर फिक्स आहे. सेंद्रिय भाजीपाला खावा, याची जागृती झपाट्याने होत असल्याने मागणी चांगली आहे.
शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या शेतीमध्ये करावा. हा विचार मला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा निर्धार केला. सध्या तेरा प्रकारचा भाजीपाला पिकवत आहेत. नजीकच्या काळात तीस प्रकारचा भाजीपाला शेतात करणार आहे. याची विक्रीची व्यापक व्यवस्था करून शेतीतून शाश्वत विकास साधणार आहे. आर्थिकदृष्ट्या शेती परवडत आहे. - अक्षय व्यंकटराव पाटील, लाटवडे
अधिक वाचा: Farmer id : राज्यात किती शेतकऱ्यांनी आपली जमीन आधार नंबरला जोडली; जाणून घेऊया सविस्तर