मेहरून नाकाडे
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळामध्ये गोविंद गणपत पुळेकर यांनी चालकपदी इमाने-इतबारे सेवा बजावली. निवृत्तीनंतर मात्र गावाकडची वाट धरली. त्यानंतर त्यांनी शेतीची कास धरली. ते विविध प्रकारची उत्पादने घेत आहेत.
७५ व्या वर्षीसुद्धा शेतात काम करण्याचा उत्साह तरुणांला लाजवेल इतका आहे. दापोली तालुक्यातील गव्हे येथील गोविंद पुळेकर यांची पाच एकर शेती असून, त्यामध्ये पावसाळ्यात भात, नाचणी, वरी, उडीद, काकडी, चिबूड, दोडका, पडवळ, भोपळा, दुधी भोपळ्याचे उत्पादन घेतात.
भात काढणीनंतर त्यामध्ये कुळीथ, वाल, कडवा, मूग, वांगी, मिरची, नवलकोल, वालीच्या शेंगा, वेलवर्गीय सर्व प्रकारच्या भाज्या, काकडी, भेंडी, गाजर, कोबी, बीट, फ्लॉवर, टोमॅटो, सिमला मिरची, कलिंगड, इतकेच नव्हे तर बटाट्याचेही उत्पन्न घेतात.
याशिवाय पाच एकर स्वतंत्र क्षेत्रावर आंबा, काजू, नारळ, सुपारी लागवड करून बागायती विकसित केली आहे. विशेष म्हणजे भाज्यांची स्वतः विक्री करतात.
लागवडीसाठी बी-बियाणे खरेदीपासून लागवडपूर्व मशागत, पाणी, खतव्यवस्थापन शिवाय तयार भाज्यांची काढणी ते बाजारात नेऊन विक्री यासाठी पुळेकर स्वतः परिश्रम घेतात. हातगाडीवर विविध भाज्या दापोली शहरात फिरून विक्री करतात.
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे त्यांच्या शेतातील पिकाचा दर्जा व उत्पादन सरस असल्यामुळे भाजीपाला विक्री सहज होते. शेतीच्या कामामध्ये त्यांना पत्नी, सून, नातवंडांचेही सहकार्य लाभते. निव्वळ शेती व विक्रीच नाही, तर गावातील शेतकऱ्यांसाठी ते उत्कृष्ट मार्गदर्शकही ठरले आहेत.
चिबुडासाठी मागणी
पावसाळ्ळ्यात भात, नागली, वरी, उडीद ही पिके घेत असताना, चिबूड, भोपळा, काकडी, दोडके, पडवळ, कारली ही पिकेही घेतात. चिबूड तसेच वेलवर्गीय सर्व भाज्यांना वाढती मागणी आहे. दररोज हातगाडीवरून भाजी विकत असताना, एकाच वेळी पाच-सहा भाज्यांचे प्रकार विक्रीला ठेवतात. त्यामुळे ग्राहकांनाही एकाच ठिकाणी विविध भाज्या मिळतात, तर पुळेकर यांचा चांगला खपही होतो. ग्राहकही त्यांची वाट पाहत असतात.
बटाट्याचे उत्पादन
कोकणच्या लाल मातीत बटाट्याचे उत्पन्न चांगले येते हे पुळेकर यांनी सिद्ध केले आहे. गतवर्षी त्यांनी ५० किलो बटाटा बियाण्याची लागवड केली होती, त्यापासून त्यांना ४०० किलोचे उत्पादन मिळाले. यंदाही बटाटा लागवडीचे उद्दिष्ट आहे. यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे रब्बीतील लागवडीला थोडा विलंब झाला आहे. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची पुळेकर लागवड करतात, माठाचे तर चार प्रकार लावत आहेत.
कोकणातील लाल मातीत प्रत्येक प्रकारचा भाजीपाला उत्पादन शक्य आहे. कष्ट करण्याची तयारी असली की, त्याचे फळ निश्चितच मिळते. निवृत्तीनंतर रिकामे बसण्याऐवजी शेती करू लागलो. कृषी विभाग, विद्यापीठातून चांगले मार्गदर्शन मिळते. बारमाही भाजीपाला उत्पादन घेत असून, स्वतःच विक्री करतो. ग्राहकांनाही दर्जा माहीत असल्याने आधीच वाट पाहत असतात. ओला काजूगर तसेच वाळलेले बी विकतो. नारळ तर हातगाडीवरच संपतात. आंबासुद्धा खासगी विक्री करतो. सुपारीला दर पाहून विक्री करतो. दापोलीतील सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत संघटनेची स्थापना केली असून, संघटनेतर्फेही शेतीबाबत माहिती देण्यात येते. - गोविंद गणपत पुळेकर, गव्हे
अधिक वाचा: आले पिकाचे टप्प्यात नियोजन करून उत्पादनाचा करेक्ट कार्यक्रम करणारे शेतकरी भारत शिंदे यांची यशकथा