सुरेंद्र शिराळकर
आष्टा: मिरजवाडी (ता. वाळवा) येथील पृथ्वीराज जगदाळे व त्रिशूल गायकवाड या युवा शेतकऱ्यांनी वीस गुंठे ब्रोकोली या विदेशी फ्लॉवरची लागवड केली.
या ब्रोकोलीचे साडेचार टन उत्पादन मिळेल. सर्व खर्च वजा जाता तीन लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आष्टा ते सांगली रस्त्यावर मिरजवाडीजवळ पृथ्वीराज जगदाळे व त्रिशूल गायकवाड यांची शेती आहे.
शेतीमध्ये वेगळा प्रयोग करायचा या दृष्टिकोनातून दोघांनी कचरे रोपवाटिकेचे अभिजित कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलेच पाऊल टाकले. त्यांना साकी ब्रोकोली या विदेशी फ्लॉवरची माहिती मिळाली.
भरपूर प्रोटिनयुक्त व कॅन्सरसाठी उपयुक्त असणारी ही भाजी आहे. त्यांनी वीस गुंठे शेतीची नांगरट करून यामध्ये शेणखत पसरले. पाच फुटाचे बेड तयार केले.
या बेडवर चार ओळी ब्रोकोलीची ८ नोव्हेंबर रोजी लागवड केली. या ब्रोकोलीला ठिबकच्या साहाय्याने नियमित पाणी दिले. तसेच करपा व अळी यासाठी कीटकनाशकांची फवारणी केली.
वेळोवेळी सेंद्रिय व रासायनिक खते दिली. दोन महिन्यांनंतर उत्पादनाला सुरुवात झाली. आजअखेर पाच तोडे झाले असून दीड टन ब्रोकोलीची विक्री केली आहे.
आणखी अडीच ते तीन टन ब्रोकोलीचे उत्पादन मिळेल, असा अंदाज शेतकरी पृथ्वीराज जगदाळे यांनी व्यक्त केला. या ब्रोकोलीला पुणे, मुंबई, गोवा येथील बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे, असे पृथ्वीराज जगदाळे यांनी सांगितले.
८० रुपये किलोला दर
ब्रोकोलीला सध्या प्रतिकिलो ८० रुपये दर मिळत आहे. चाळीस हजार रुपये उत्पादन खर्च आला आहे. ब्रोकोलीचे चार ते साडेचार लाखांपर्यंत उत्पादन मिळेल, असा विश्वास शेतकरी पृथ्वीराज जगदाळे यांनी व्यक्त केला.
आम्ही शेतीमध्ये पहिलेच पाऊल टाकले असून सुरुवातीलाच ब्रोकोलीसारख्या विदेशी भाजीची निवड केली. या भाजीला पुणे, मुंबई, गोवा येथे मागणी आहे. पहिल्याच प्रयत्नात चांगले यश मिळाले आहे. आंतरपीक मेथी, कोथिंबीर, कांद्याचे घेतले असून त्याचे २० हजार मिळाले. सुमारे १० गुंठे पेरू लावला आहे. विक्री केली आहे. आणखी अडीच ते तीन टन ब्रोकोलीचे उत्पादन मिळेल, असा अंदाज शेतकरी पृथ्वीराज जगदाळे यांनी व्यक्त केला. या ब्रोकोलीला पुणे, मुंबई, गोवा येथील बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे, असे पृथ्वीराज जगदाळे यांनी सांगितले. - पृथ्वीराज जगदाळे, त्रिशूल गायकवाड, युवा शेतकरी, मिरजवाडी
अधिक वाचा: खडकाळ माळरानावर बहरली देशी पावट्याची शेती; मानसिंगरावांना मिळाली हमखास उत्पन्नाची हमी