Join us

शेतीत रमली मुंबईची कविता; यशस्वी नैसर्गिक शेती करणाऱ्या योगशिक्षिकेचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:53 IST

मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून बाहेर पडून दापोली तालुक्यातील रोवले गावात कविता आशुतोष चांदोरकर यांनी शेतीचे स्वप्न साकारले आहे.

शिवाजी गोरेदापोली : मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून बाहेर पडून दापोली तालुक्यातील रोवले गावात कविता आशुतोष चांदोरकर यांनी शेतीचे स्वप्न साकारले आहे.

गेली वीस वर्षे त्या नैसर्गिक व सेंद्रिय शेतीत कार्यरत आहेत. इच्छा असली की आपल्याला हवे असलेले मार्गही सापडतात, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

योगशिक्षिका असलेल्या कविता चांदोरकर यांना पर्यावरणपूरक जीवनशैलीची ओढ होती. त्यांनी रासायनिक शेतीचा त्याग करून सेंद्रिय शेतीचा स्वीकार करत निसर्गाशी नाते जोडले आहे.

त्यांच्या शेतात पारंपरिक आणि आधुनिक शेतीचा सुरेख संगम आहे. नारळ, आंबा, काजू, हळद, लाल तांदूळ लागवड करतानाच त्यांनी कोकण कपिला देशी गायींचे संगोपनही सुरू केले आहे.

गोमूत्र, शेण व वैदिक तुपावर आधारित जैविक उत्पादनांचा वापर करत त्यांनी स्थानिक तसेच परदेशी बाजारात ठसा उमटवला आहे.

२०२० मधील निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान झाले असले तरीही त्यांनी हार न मानता नव्याने शेती उभी केली. गोबर गॅस, सौरऊर्जा, सोलर ड्रायरसारख्या हरित तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरणपूरक शेतीचा आदर्श घालून दिला आहे.

कविता चांदोरकर यांचा प्रवास म्हणजे निसर्गप्रेम, चिकाटी आणि नवनवीन प्रयोगशीलतेचे प्रतीक आहे. त्यांनी उभे केलेले काम आता त्यांच्यापुरते मर्यादित नसून, ते ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

रासायनिक खते न वापरता सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीचे पर्यावरणपूरक महत्व त्यांनी पटवून दिले आहे.

आधुनिकतेसह परंपराहीपारंपरिक भात शेतीला यांत्रिक शेतीची जोड देऊन कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी कविता चांदोरकर यांचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या शेतमालाला योग्य बाजार भाव मिळावा, यासाठी त्या नैसर्गिक दर्जेदार उत्पादनावरच भर देतात.

व्यवसाय नाही, जीवनशैली- शेती म्हणजे फक्त व्यवसाय नाही, तर जीवनशैली असू शकते हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिलं आहे.- चांदोरकर यांनी देशी गायींचे संगोपन करून सेंद्रिय शेतीला दिशा दिली आहे.- गायीच्या शेणापासून खत, गोबर गॅस आणि गोमुत्राचा वापर करून त्यांनी आपली शेती १०० टक्के सेंद्रिय केली आहे.- त्यांच्या बागेत आंबा, काजू, नारळ, सुपारी, चिकू यासारखी फळझाडे रसायनमुक्त पद्धतीने वाढवली जातात.- कोणतेही रासायनिक खते किंवा कीटकनाशके न वापरता त्यांनी नैसर्गिक शेतीचा आदर्श उभा केला आहे.

अधिक वाचा: तुकडेबंदी कायद्या संदर्भात महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला होणार फायदा? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :शेतीमहिलाशेतकरीपीक व्यवस्थापनपीककोकणसेंद्रिय शेतीफळेफलोत्पादनयोगासने प्रकार व फायदेशिक्षकगाय