शिवाजी गोरे
दापोली : प्राचीन काळापासून महिलांचेशेतीत मोलाचे योगदान आहे. आजही त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात कष्ट करताना दिसतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, काढणीपासून तर विक्रीपर्यंत महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांचे योगदान शेतीला अधिक सक्षम आणि समृद्ध बनवते. हीच बाब दापोली तालुक्यातील कुंभवे गावच्या मनीषा शिगवण यांनीही सिद्ध केले आहे.
शिक्षण, शेती आणि ग्रामीण उद्योजकता यांचा सुरेख संगम साधत एक नव्या युगाची आदर्श महिला म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे.
पूर्वाश्रमीच्या पिसई गावच्या आणि सध्या कुंभवे गावातील रहिवासी असलेल्या मनीषा शिगवण लहानपणापासूनच अभ्यासू आणि कष्टाळू स्वभावाच्या आहेत.
लग्नाच्या दिवशी सकाळी परीक्षा देऊन दुपारी विवाह करून त्यांनी शिक्षणाप्रती असलेली आपली निष्ठा दाखवली होती. सुरुवातीला टीकेचा विषय ठरलेल्या या निर्णयाचे आज मात्र अनेकांना कौतुक वाटते.
एम.ए.पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण करूनही नोकरी न करता शेतीचा मार्ग निवडणाऱ्या मनीषा शिगवण यांनी 'नोकरी मागणारी न बनता, नोकरी देणारी व्हावे' ही भूमिका आत्मसात केली आहे.
भात, नाचणी, वरी यांसारखी पारंपरिक पिके तसेच भाजीपाला, फळबाग आणि सेंद्रिय पालेभाज्यांची लागवड त्यात समाविष्ट आहे. काकडी, मिरची, वांगी, पडवळ, गवार, आंबा, काजू, कलिंगड, आदी पिकांचे नियोजन, उत्पादन आणि विक्री यांवर त्या स्वतः लक्ष ठेवतात.
दुग्ध व्यवसायातही यश
◼️ मनिषा शिवगण यांनी दुग्ध व्यवसायातही यश मिळवले असून, सध्या त्यांच्या गोठ्यात २५ जनावरे आहेत.
◼️ याशिवाय २० पेक्षा अधिक शेळ्या, कुक्कुटपालन प्रकल्प आणि गांडूळ खतनिर्मिती केंद्रांमुळे त्यांनी शेतीपूरक व्यवसायांचाही प्रभावी विकास केला आहे.
◼️ घरातील सर्व कामकाज, जमिनीचे व्यवहार, मजूर नियोजन, पॉवर टिलर चालवणे, ट्रॅक्टर हाताळणे, गोठ्याची देखभाल आणि विक्री व्यवस्थापन ही सगळी कामे त्या स्वतः करतात. हीच त्यांची खरी शक्त्ती आहे.
कष्टातून विस्तारली शेती
◼️ पती अनिल शिगवण यांच्यासह त्यांनी व्यावसायिक पद्धतीने शेतीचा विकास करत ग्रामीण उद्योजकतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
◼️ सुरुवातीला १५ गुंठ्यांत सुरू झालेली त्यांची शेती आज १५ एकरांवर विस्तारलेली आहे. यामध्ये वडिलोपार्जित पाच एकर तर गावात भाडेतत्त्वावर घेतलेली १० एकर जमीन आहे.
कार्यकुशलता
त्यांचे पती अनिल शिगवण हेही ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
गावाकडचा नवरा
◼️ कोकणातील मुली नवरा शोधताना अनेकदा मुंबईकर किंवा शहरी भागातील निवडतात.
◼️ मनीषा यांनी गावाकडचा, शेतकरी नवरा निवडला आणि त्याच्या साथीने शेतीमध्ये यश मिळवून दाखवलं, हे अधिक कौतुकास्पद आहे.
◼️ शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता विविध प्रयोग करावेत, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?