सचिन गायकवाड
तरडगाव : सैन्यातून निवृत झाल्यावर शेतीची आवड असणारे तरडगाव येथील प्रल्हाद साहेबराव अडसूळ यांनी रोटरी महर्षी दिवंगत आप्पासाहेब चाफळकर यांच्या प्रेरणेने बेबी कॉर्न मकापीक घेण्यास सुरुवात केली.
गेली २३ वर्षे ते दादासो व सुदाम अडसूळ या बंधुसमवेत एकत्रितरीत्या शेती करीत आहेत. तसेच २० एकरांत टप्प्याटप्प्याने मका घेत असून यातून वर्षाला २५ लाख रुपये उत्पन्न मिळवत आहेत.
प्रल्हाद अडसूळ यांनी स्थानिक शेतकऱ्यांना एकत्र करून विदेशी पीक समजले जाणारे बेबी कॉर्न मका परिसरात घेण्यास सुरुवात केली.
यातून त्यांना चांगलाच हमीभाव देण्याचा प्रयत्न केला. तर हे बंधू प्रत्येक १५ दिवसांनी तीन एकरात बेबी कॉर्न मका लागवड करतात. ६० दिवसांत काढणीला येते. येथून पुढे १५ दिवस तोड सुरू राहते.
एका एकरात साधारण एक टन कणसे मिळतात. त्यातून ५० हजार रुपये इतके उत्पन्न मिळते. यासाठी १० ते १२ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. हे पीक कमी कालावधीचे असते. यामुळे अडसूळ बंधू २० एकरांत टप्याटप्याने पीक घेतात.
सतत लागवड सुरूच राहत असल्याने वर्षाकाठी या एकूण क्षेत्रात त्यांना २५ लाख रुपये इतके उत्पन्न मिळते. बेबी कॉर्न मका या पिकाच्या शेतीमुळे गरजूंच्या हातांनाही काम मिळाले आहे.
पोषक चारा उपलब्ध...
मक्याची कणसे लहान व कोवळी असताना ती खुडली जातात. कमी कालावधीत हे पीक संपुष्टात येते. चारा जनावरांसाठी चांगला उपयोगी पडतो. यामुळे असंख्य जनावरे व गोठा असलेल्या शेतकऱ्यांनीही पीक घेतल्यास फायद्याचे ठरते.
बेबी कॉर्न पीक हे दुग्ध व्यवसायाला चालना देणारे असून शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. तसेच अशा शेतीमुळे आम्हा बंधूंचा कौटुंबिक एकोपा वाढून चांगले यश संपादन करता आले आहे. - प्रल्हाद अडसूळ, शेतकरी तरडगाव
अधिक वाचा: उसाच्या एफआरपी वाढीशी साखर-इथेनॉल दर लिंक केले जाणार; लवकरच प्रस्ताव केंद्र शासनाकडे