मेहरून नाकाडे
रत्नागिरी: कार्यतत्पर आणि मदत करण्याच्या स्वभावामुळे रत्नागिरी तालुका कृषी कार्यालयात काम करणारे माधव बापट शेतकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होते.
शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असताना त्यांनाही शेतीची आवड निर्माण झाली. सन २००७ मध्ये त्यांनी खानवली (लांजा) येथे १२ एकर जमीन खरेदी केली.
जंगल असल्याने ते साफ करून दरवर्षी ५० आंबा कलमे याप्रमाणे लागवड केली. शासकीय सेवेत काम करत असल्याने त्यांना पूर्णवेळ शेतीकडे लक्ष देता येत नव्हते.
मात्र, पत्नीची भक्कम साथ त्यांना मिळाली. दि. ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पूर्णतः शेतीच्या कामात स्वतःला झोकून दिले आहे.
माधव बापट यांनी ५०० आंबा व ४०० काजूची लागवड केली आहे. आंब्यामध्ये हापूस व केशर, तर काजूमध्ये त्यांनी वेंगुर्ला ७ व ४ या जातीच्या कलमांची लागवड केली आहे.
बापट यांनी शेती करताना, १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने शेती असाच निश्चय केला होता. त्यासाठी ते गोपालन करून दुग्धोत्पादन व्यवसायही करत आहेत. त्यांनी सहा देशी गाींचे संगोपन केले आहे.
गोमूत्रापासून जीवामृत, शेणापासून कंपोस्ट खत तयार करून त्याचा वापर बागायती, शेतीसाठी करत आहेत. याशिवाय शेळीपालनही करत आहेत. २२ शेळ्या असून, विष्ठेचा वापर खत म्हणून करत आहेत.
संपूर्ण सेंद्रिय आंबा, काजू असल्यामुळे ग्राहकांची मागणीही अधिक आहे. आंबा खासगीच विक्री करत आहेत. काजूबी प्रक्रिया करून सालीचे, बिनसालीचे गर काढून विक्री करत आहेत.
कातळावर पिकांची लागवड
बापट यांनी जमीन खरेदी केली तेव्हा अर्धा भाग मातीचा, तर अर्धा भाग कातळ होता. कातळावर माती टाकून बापट शेती करत आहेत. एक एकर क्षेत्रावर ते खरिपात भात लागवड, तर दहा गुंठे क्षेत्रावर नाचणीची लागवड करीत आहेत. कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता, केवळ सेंद्रिय खताचा वापर करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील भात व नाचणीचे उत्पादनसुध्दा सकस व दर्जेदार आहे.
गांडूळ खत युनिट
बापट यांनी शेणखत, बागेतील पालापाचोळा, शेतातील गवत यांचा वापर करून बागेतच गांडूळ खत युनिट तयार केले आहे. दरवर्षी स्वतः खत तयार करून त्याचाच वापर ते शेतासाठी व बागायतीसाठी करत आहेत. याशिवाय कडूलिंबाची पेंडही वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच सेंद्रिय खते वापरत असल्याचे बापट यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
कातळावर भात, नाचणी लागवड करताना बापट आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. विद्यापीठ प्रमाणित भाताची रत्नागिरी ५, तर नाचणीची दापोली ३ या वाणाची लागवड करीत आहेत. शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याच्या समस्येवर मात करताना आवश्यक ती कामे यांत्रिक अवजारांच्या सहाय्याने करत आहेत. त्यामुळे वेळ, पैसा, श्रमाची बचत होत आहे.
अधिक वाचा: ७५ वर्षाची आजी 'ह्या' योजनेतून झाली २७ गुंठे सातबाराची मालकीण; वाचा सविस्तर