हरभरा हे रब्बीतील एक महत्वाचे पीक आहे. ज्याचे उत्पादन भारतात विविध भागात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याचबरोबर यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देखील मिळवता येते.
त्यामुळे योग्य पाणी व्यवस्थापन हरभरा पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते कारण पाण्याची योग्य मात्रा पीकाच्या वाढीवर मोठा प्रभाव टाकते. याचअनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत हरभरा पिकाला पाणी देण्याच्या योग्य वेळा आणि पद्धतीची सविस्तर माहिती.
हरभरा पिकाला पाणी देण्याच्या वेळा आणि पद्धती
• हरभरा पिकास सुरुवातीला उगवणीनंतर पहिले पाणी पीक कळीवर असताना (४० ते ४५ दिवसांनी) देणे गरजेचे असते. त्यानंतर दुसरे पाणी घाटे भरतेवेळी (७० ते ७५ दिवसांनी) देणे आवश्यक आहे.
• कधी कधी, विशेषतः मर्यादित ओलीत असलेल्या जमिनीत, घाटे भरतेवेळीच एक ओलीत देणे पुरेसे असते.
• यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे, दोन ओळी रुंद वरंबा सरी पद्धतीने ओलीत केल्यास इतर पद्धतीच्या तुलनेत ३०% पाणी बचत होते आणि उत्पादनात २०% वाढ होते.
• जमिनीनुसार पाणी देण्याची वेळ साधारणपणे २० ते २५ दिवसांच्या अंतरावर ठेवली जाते. मध्यम जमिनीत उगवणीनंतर पहिले पाणी, कळी असताना दुसरे, आणि घाटे भरतेवेळी तिसरे पाणी द्यावे.
• हलक्या जमिनीत पिकाची स्थिती पाहून पाणी देणे आवश्यक आहे. याबाबत, जास्त पाणी दिल्यास पिकाचे उभळण्याचा धोका असतो. त्यामुळे, पाणी देण्यास उशीर करू नये आणि पाणी साचू देऊ नये. अन्यथा मुळकुजव्या रोगामुळे पिकाचे नुकसान होऊ शकते.
तुषार सिंचन पद्धती; फायदेशीर व प्रभावी
• हरभरा पिकाला पाणी देताना तुषार सिंचन पद्धती अत्यंत फायदेशीर ठरते. ही पद्धत पिकाच्या पाण्याच्या आवश्यकतेला बरोबर प्रतिसाद देते आणि यामुळे पिकाच्या उत्पादनात चांगली वाढ होते.
• या पद्धतीमुळे पाणी चांगल्या प्रकारे शेतात पसरते आणि जमिनीचा भुसभुशीतपणा कमी होण्यापासून वाचवते. यामुळे मशागतीचा खर्च कमी होतो परिणामी अधिक उत्पन्न हाती येते.
• हरभरा पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी पाणी व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते.
• तुषार सिंचन पद्धती यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करून चांगले उत्पादन मिळवू शकतात, तसेच त्यांच्या खर्चातही बचत होऊ शकते.
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषि विद्या विभाग
दादासाहेब पाटील कृषि महाविद्यालय,
दहेगाव ता. वैजापूर जि. छ. संभाजीनगर.
हेही वाचा : सुगंधी वनस्पती 'गवती चहा'ची लागवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
