राजरत्न सिरसाट
राज्यात हळद पिकाचे क्षेत्र झपाट्याने वाढत असताना, मजुरांच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना लागवड व काढणीस अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयांतर्गत कृषी अभियांत्रिकी विभागाने हळदीसाठी ट्रॅक्टरचलित आधुनिक लागवड यंत्र विकसित केले आहे.
या यंत्रामुळे हळदीची लागवड जलद, सोपी आणि कमी खर्चात करता येणार आहे. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहाय्याने विकसित करण्यात आलेल्या या यंत्रामुळे ५० ते ७० टक्केपर्यंत लागवड खर्चात बचत होणार असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
कृषी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. विवेक खांबलकर यांनी विकसित केलेल्या या यंत्राचे प्रात्यक्षिक गुडधी येथील प्रक्षेत्रावर घेण्यात आले. यावेळी यंत्राद्वारे वायगाव हळदीची लागवड करण्यात आली असून, पीक उत्कृष्ट येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे यंत्र ९० सेमी रुंदीचा गादी वाफा तयार करून दोन ओळींमध्ये ४ ते ६ इंच अंतरावर हळद लावते.
प्रात्यक्षिकाच्या वेळी शेकडो शेतकऱ्यांनी यंत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या महाराष्ट्रात ८६,००० हेक्टरवर हळद लागवड असून, हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यांतील शेतकरीही मोठ्या प्रमाणात हळद लागवडीकडे वळत आहेत.
वायगाव हळदीचा प्रयोग
• या हळद लागवड यंत्राच्या सहाय्याने यावर्षी कृषी विद्यापीठाच्या गुडधी येथील प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक घेण्यात आले असून, या यंत्राने वायगाव हळद लागवड करण्यात आली आहे. पीक उत्तम आहे.
• हे यंत्र लागवड करताना २० सेमीचा गादी वाफा तयार करून देत असून, दोन ओळींच्या अंतरावर चार ते सहा इंच दरम्यान हळद लागवड करता येते.
• कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर यांनी प्रक्षेत्राला भेट देऊन हळद पिकाच्या यशस्वी संशोधनाची पाहणी केली आहे. शिवार फेरीत यंत्राला शेकडो हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी भेट देऊन बघितले आहे.