महाराष्ट्रात खरीप, रांगडा आणि रबी हंगामनिहाय कांदा लागवड केली जाते. यात हंगामनिहाय लागवड व काढणी कालावधी वेगवेगळा असतो. तसेच वाण ही वेगवेगळे असतात. हंगामनिहाय लागवड नियोजन कसे करायचे ते सविस्तर पाहूया.
१) खरीप हंगाम
◼️ खरीप कांदा ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात बाजारपेठेत आणता आला तर चांगला दर मिळतो.
◼️ त्यासाठी बियाणे पेरणी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मे महिन्यात करून रोपांची लागवड जून-जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी.
◼️ जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झाली तर सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात कांदा काढणीला येतो.
◼️ या काळात पाऊस नसेल तर काढणी व तात्पुरती सुकवणी चांगली होऊ शकते.
कोणते वाण निवडाल?
भीमा सुपर, भीमा राज, भीमा रेड, तसेच पांढऱ्या जातीमध्ये भीमा शुभ्रा, भीमा श्वेता तसेच अन्य कृषि विद्यापीठ, फलोद्यान संशोधन संस्थांनी विकसित केलेल्या बसवंत ७८०, फुले समर्थ किंवा अँग्रिफाउंड डार्क रेड, अर्का कल्याण जातींची निवड करावी.
२) रांगडा हंगाम
◼️ ऑगस्ट-सप्टेंबर बी पेरून रोपांची पुर्नलागवड ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.
◼️ काढणी जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात होते.
◼️ ज्या शेतकऱ्यांना खरीपात पाण्याअभावी लागवड करता येत नाही आणि ज्याच्या विहिरीतील पाणी जेमतेम फेब्रुवारी-मार्च पर्यंतच पुरते, त्यामुळे रबी कांदा करता येत नसल्याने रांगडा कांद्याची लागवड करावी.
◼️ रबी हंगामातील किंवा खरिपातील जातींचे स्वतः घरी अशास्त्रीय पद्धतीने तयार केलेले बी वापरून रांगडा हंगामात लागवड केली तर डेंगळे वाढण्याची शक्यता जास्त असते.
कोणते वाण निवडाल?
बसवंत ७८०, एन २-४-१, अॅग्रिफाउंड लाइट रेड, फुले समर्थ, भीमा सुपर, भीमा रेड, भीमा शक्ती, भीमा शुभ्रा या जार्तीची लागवड करावी. एन २-४-१, अॅग्रिफाउंड लाइट रेड या जातीमध्ये रांगडा हंगामात वातावरणानुसार डेंगळे येण्याचे प्रमाण असू शकते.
३) रबी हंगाम
◼️ रबी हंगामातील हवामानामुळे कांद्याची प्रत चांगली असते व उत्पादन अधिक मिळते.
◼️ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बियाणे पेरून रोपांची लागवड डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करावी.
◼️ नोव्हेंबर महिन्यात शेवटी लागवड केली तर एप्रिलमध्ये काढणी होते.
◼️ पाती आणि कांद्याची सुकवण चांगली होते.
◼️ सुकवलेला कांदा साठवणीत चांगला टिकतो.
◼️ लागवडीस शिफारशीत कालावधीपेक्षा उशिरा झाला तर उत्पादनात घट येते.
अधिक वाचा: हळद व आले पिकाच्या उत्पादन वाढीसाठी कसे कराल लागवडीचे नियोजन? जाणून घ्या सविस्तर