भूगर्भातील पाण्याचा वापर केल्यानंतर पावसाळ्यात भूजलपातळी कायम ठेवण्यासाठी भूगर्भात पाण्याचा भरणी करणे अत्यंत आवश्यक आहे.
पाण्याच्या शोधात प्रत्येक शेतकरी दरवर्षी त्यांच्या विहिरी खोल करताना दिसत आहेत. याचे कारण म्हणजे विहिरीद्वारे भूजलाचा उपसा होण्याचे प्रमाण हे जमिनीत मुरणाऱ्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भूजलपातळी खोल जात आहे.
वर्षभर पाण्याच्या उपलब्धतेसाठी भूजलपातळी स्थिर राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी भूजल पुनर्भरण हा महत्वाचा उपाय होय. जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे व भिन्न थर आढळतात.
यामध्ये मातीचा, मुरुमाचा आणि खडकाचा थर असू शकतो. या थराची जाडी, आकारमान वेगवेगळे असते. पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजल साठ्यापर्यंत पोहोचण्यास साधारणपणे एक महिना किंवा त्याहून जास्त कालावधी लागतो.
पाणी उपसण्याचा वेग या वेगापेक्षा खूप जास्त आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरविण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
आपल्या विहिरीला पाणी टिकून ठेवायचे असेल तर जमिनीत पाणी मुरविणे तितकेच महत्वाचे आहे. यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे संशोधन करून कृत्रिमरित्या विहिरीचे पुनर्भरण करण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे.
कसे कराल विहीर पुनर्भरण?
- विहिरीपासून तीन मीटर अंतरावर दोन टाक्या बांधून घ्याव्यात.
- पहिले टाके १.५ मीटर लांब, १ मीटर रुंद व १.५ मीटर खोल घ्यावे.
- दुसरे टाके दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल पहिल्या टाकीला लागूनच घ्यावे.
- दोन्ही टाक्यांच्यामध्ये ४५ सेंटीमीटर लांब ४५ सेंटीमीटर रुंद व ६० सेंटीमीटर खोल अशी एक खाच ठेवावी.
- दुसऱ्या टाकीच्या तळाशी ३० सेंटीमीटर जाडीचा मोठ्या दगडाचा थर भरावा.
- त्या थरावर ३० सेंटीमीटर जाडीचा छोट्या दगडाचा थर भरावा. त्यावर ३० सेंटीमीटर जाडीचा वाळूचा थर भरून घ्यावा.
- या टाक्याच्या तळापासून चार इंची पीव्हीसी पाईप काढून विहिरीशी जोडावा.
- पुनर्भरण करण्यासाठी विहिरीत सोडलेला पाईप विहिरीच्या कडेपासून १ ते १.५ फूट समोर आणावा.
- नाल्यातील पाण्यामधील गाळ, कचरा इत्यादी जड पदार्थ पहिल्या टाकीच्या तळाशी स्थिरावतील आणि खाचेद्वारे दुसऱ्या टाक्यामध्ये वर वरचे पाणी जाईल.
- दुसऱ्या टाक्यामध्ये गाळण यंत्रणा टाकलेली असल्यामुळे यातून स्वच्छ व कणविरहीत पाणी ४ इंच पाईपद्वारे विहिरीत जाऊन पुनर्भरण होईल.
अधिक वाचा: दस्त नोंदणी अधिनियमात दुरुस्ती, आता मिळकतीची ओळख पटविणारी खूण बंधनकारक; वाचा सविस्तर