यंदा मान्सूनवर 'एल निनो'चे सावट असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे झाले आहे.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना मिश्र पिके, आंतरपिके आणि कमी पाण्याच्या पिकांकडे वळण्याचा सल्ला दिला आहे. प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात होणाऱ्या बदलांमुळे एल निनोची स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे यंदा मान्सून लांबण्याची किंवा पावसाला मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. ऐन पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पाऊस गायब झाल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते.
मिश्र पिके, आंतरपिकांचाही पर्याय
◼️ एकाच पिकाचे नुकसान झाल्यास दुसरे पीक आधार देऊ शकते, यासाठी आंतरपीक पद्धत वापरावी.
◼️ शेतकऱ्यांनी सोयाबीन अधिक तूर, कपाशी अधिक मूग किंवा उडीद, आणि बाजरी अधिक तूर यांसारख्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामुळे मुख्य पीक धोक्यात आले, तरी आंतरपिकातून उत्पन्न मिळते.
कमी पाण्याची कोणती पिके घ्यायची?
◼️ कमी पावसात आणि कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड यंदा फायदेशीर ठरणार आहे.
◼️ यामध्ये बाजरी, तूर, ज्वारी, नाचणी, मका, मूग, उडीद, सोयाबीन ही पिके घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
◼️ ही पिके कमी पाण्यात आणि ६० ते २० दिवसांत पदरात पडतात, ज्यामुळे पावसाचा खंड पडला तरी नुकसान कमी होते.
पाणी बचतीसाठी उपाय?
◼️ जमिनीतील ओलावा टिकवून धरण्यासाठी पालापाचोळा किंवा प्लास्टिकचा वापर करून आच्छादन करावे.
◼️ पाऊस उघडल्यानंतर शेतात वेळेवर कोळपणी करावी, ज्यामुळे जमिनीला पडणाऱ्या भेगा बुजतात.
◼️ तसेच शेतातील तण वेळेवर काढून पाण्याचा अपव्यय टाळावा.
कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला
◼️ शेतकऱ्यांनी सरसकट एकाच मुख्य पिकाची पेरणी करू नये.
◼️ ७५ ते १०० मिमी चांगला पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीमध्ये पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये.
◼️ पेरणी करताना दोन पिकांमधील अंतर योग्य ठेवावे जेणेकरून उपलब्ध ओलावा पिकांना पुरेसा पडेल.
◼️ त्यामुळे पारंपरिक पिकांपेक्षा लहरी हवामानाचा सामना करू शकतील, अशा पिकांची निवड करणे आवश्यक आहे.
मूलस्थानी जलसंधारण
महात्मा फुले कृषी विद्यापीठ शिफारशीत मूलस्थानी जलसंधारणासाठी तुरीमध्ये मृत सरी तयार करण्याचे तंत्रज्ञान योग्य आहे. दोन ओळीत बळीराम नांगराने सरी टाकावी.
बीबीएफ व मृत सरीचे फायदे
◼️ पडलेले पावसाचे पाणी जमिनीत मुरते
◼️ तुरीच्या बुडाला मातीची भर लागते व हवा खेळती राहते.
◼️ परतीचा मोठा पाऊस झाला तरी तुरीतील अति पाणी सरीमार्फत बाहेर काढता येते.
◼️ सोयाबीनमध्ये बीबीएफ तंत्रज्ञान चांगले आहे. बियाणे कमी लागते.
◼️ फवारणीसाठी मुबलक जागा उपलब्ध होते.
◼️ मूलस्थानी जलसंधारण होते.
◼️ हार्वेस्टर/रिपरनी काढणी सोपी होते.
◼️ संरक्षित पाणी एक आड एक सरीने देता येते.
हवामान विभागाने एल निनोचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापासूनच खरीप हंगामाचे नियोजन सुरु केले पाहिजे. पारंपरिक आणि एकाच पिकावर अवलंबून न राहता हवामान अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास फायदा होईल. शेतीविषयक सल्ला घेण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा. - सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अधिक वाचा: Monsoon Arrival : हवामानात मोठा बदल; मान्सूनचे वारे 'या' तारखेपर्यंत तळकोकणात दाखल होणार
