छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील महत्त्वाचा शिवना टाकळी मध्यम सिंचन प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तब्बल १५ वर्षानंतर या प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय पूर्ववत सुरू होणार असून, पुनर्वसित गावांमधील ग्रामस्थांसाठी ही दिलासादायक बातमी ठरली आहे.
शिवना टाकळी प्रकल्पाचे काम १९८२ साली सुरू झाले होते. २००४-०५ मध्ये हा प्रकल्प एआयबीपी योजनेत समाविष्ट झाला आणि २००८-०९ मध्ये प्रत्यक्ष सिंचनासाठी कार्यान्वित झाला. यामुळे कन्नडसह शेजारच्या गावांतील सुमारे ८ हजार ९४७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळाला. मात्र, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे केसापूर, टाकळी, लव्हाळी, आलापूर, अंतापूर, जैतापूर ही गावे पुनर्वसित झाली आणि त्यांना सुविधा पुरवण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागावर आली.
२००८-०९ मध्ये शिवना टाकळी येथे सहायक अभियंता श्रेणी-१ चे पद तयार करून दोन कोटी रुपयांच्या खर्चातून उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात आले. परंतु, केवळ एका वर्षातच कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हे कार्यालय छत्रपती संभाजीनगरला हलविण्यात आले. त्यामुळे पुनर्वसित गावांमधील ग्रामस्थांना सातत्याने त्रास सहन करावा लागत होता.
या अन्यायाविरोधात मंगळवारी (दि. ५ ऑगस्ट) सामाजिक कार्यकर्ते बापू गवळी, अनिल बोडखे, प्रकाश आहेर, प्रकाश बोडके, अशोक पवार, हेमंत व्यवहारे आणि शेकडो शेतकऱ्यांनी संभाजीनगर पाटबंधारे कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले.
या आंदोलनाला अखेर यश आले असून, प्रशासनाने लेखी आश्वासन देत शुक्रवारी (दि. ८ ऑगस्ट) कार्यालयाची साफसफाई करून १५ ऑगस्टपासून कार्यालय पुन्हा सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. हे कार्यालय पुन्हा सुरू झाल्यामुळे शेतकरी व पुनर्वसित गावांतील ग्रामस्थांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडवणे शक्य होणार असून, या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर