रत्नागिरी : यावर्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादन जेमतेम २५ ते ३० टक्केच आहे. असे असूनही वाशी (नवी मुंबई) बाजार समितीतर्फे आवक दर्शविणाऱ्या पावतीतील आकड्यांवरून आंबा बागायतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
उत्पादन कमी असताना, हाती आकडे घालून पेट्यांची संख्या वाढली असल्याचे बागायतदारांनी सांगितले. रत्नागिरीसह अन्य राज्यातूनही आंबा व अन्य फळे विक्रीसाठी वाशी बाजार समितीमध्ये पाठविले जातात.
त्यामुळे दिवसाला बाजार समितीत लाखोंचे व्यवहार होत असतात. बागायतदारांनी आंबा पेट्या पाठविल्यानंतर त्यांची नोंद केली जाते. मात्र, नोंद करण्यात येणारी पावतीच फसवी असण्याचा संशय व्यक्त होत आहे.
यावर्षी कोकणात एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. मात्र, राज्यातील आवक दाखविताना आवक वाढविल्याचा आक्षेप बागायतदारांनी घेतला आहे.
या ठिकाणी पावत्यांवर हाती आकडे घातले जात असल्याने कमी उत्पादन असूनही ते जास्तीचे दाखविले जात असल्याचा आक्षेप बागायतदारांनी घेतला आहे.
संगणकीय प्रणालीचा वापर करा
- वाशी मार्केटमध्ये संगणकीय पद्धतीने पावती नसणे ही खेदाची बाब आहे.
- बाजारात येणाऱ्या प्रत्येक आंबा पेटीची तसेच येणाऱ्या प्रत्येक गाडीची संगणकीय नोंद केल्यास त्यात फेरफार करणे किंवा खाडाखोड करणे शक्य होणार नाही, असे बागायतदारांचे म्हणणे आहे.
- तसेच कोकणातून जाणाऱ्या आंब्यांचे प्रमाण किती आहे, याची अचूक माहिती मिळेल, असे बागायतदारांनी सांगितले.
अधिक वाचा: Namo Kisan Hapta : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल?