सोलापूर : गुजरात आणि आंध्र प्रदेशात कांदा उत्पादन वाढल्यामुळे सोलापुरातील कांद्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. दहा दिवसांपूर्वी सात हजार रुपये क्विंटलला विकणारा कांदा आता साडेचार हजारांपर्यंत विकला जात आहे.
पुढील महिनाभर दरात घसरण होत राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असते. दिवाळीनंतर दररोजी ४०० ते ५०० ट्रक कांद्याची आवक सुरू झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यामध्ये कमाल दर सात ते आठ हजार रुपयांपर्यंत होता. सरासरी दरही चांगला होता. सरासरी दर ४००० ते ५००० रुपये मिळत होता. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही कमाल दर सात हजार ते साडेसात हजार आणि सरासरी दर ३००० ते ३५०० रुपये होता.
दहा डिसेंबरनंतर दरात सुरू झालेली घसरण आता थांबायला तयार नाही. १२ डिसेंबरपर्यंत कमाल दर ६००० रुपयांपर्यंत होता. त्यानंतर दोन दिवसा ५००० ते ५४०० रुपयांचा दर मिळला. मात्र काही दोन दिवसांत दरात मोठी घसरण झाली आहे.
मंगळवारी ४२०० रुपये आणि बुधवारी ४६०० रुपये दर मिळाला आहे. कमाल दराप्रमाणे सरासरी दरातही मोठी घसरण झाली आहे. सरासरी दर ३५०० रुपयांवर थेट आता १८०० रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
कच्चामाल नको.. दरात होईल घट
सध्या कच्चामाल मोठ्या प्रमाणात येत आहे. त्याचा परिमाण थेट दरावर होणार आहे. कच्चामाल जास्त दिवस टिकत नाही. शिवाय मालही खराब होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतामध्ये कांदा वाळवून आणावा, जेणे करून दरही चांगला मिळेल आणि मालही खराब होणार नाही. चांगल्या कांद्याला दरही चांगला मिळतो.
सोलापूरच्या कांद्याला गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणातून मागणी मोठी आहे. मात्र, सध्या गुजरात आणि आंध्र प्रदेशामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे सोलापूरच्या कांद्याला मागणी कधी झाली आहे. पुढील महिनाभर अशी परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. - नामदेव शेजाळ कांदा विभागप्रमुख, सोलापूर बाजार समिती
सोलापूर जिल्ह्यातून दिवाळीनंतर कांदा मोठ्या प्रमाणात येतो. डिसेंबर आणि जानेवारी दोन महिने मोठी आवक असते. दरवर्षी शेतकऱ्यांचा कांदा विक्रीला आल्यावर दर पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. दर पडून नये, यासाठी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. - शिवपुत्र बिराजदार, शेतकरी