कोल्हापूर : एकीकडे उन्हाचा पार वाढल्याने नागरिकांना चटके सहन करावे लागत आहेत. गेल्या आठवड्यापेक्षा मिरचीच्या दरात सरासरी प्रतिकिलो शंभर रुपयांची वाढ झाली आहे.
खरीप हंगामातील मिरचीला पावसाने फटका बसला आणि त्यानंतरच्या हंगामावरही अवकाळी पावसाचे पाणी पडल्याने आवक कमी झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज विभाग सोडला तर लाल मिरचीचे पीक कमी प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांतून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक होते.
त्यातही आपल्याकडे पावसाची बेगमी म्हणून जानेवारी फेब्रुवारीपासून चटणी करून ठेवण्याची पद्धत आहे. मार्चनंतर हे प्रमाण वाढत जाते.
मात्र, यंदा खरीप हंगामातच परतीच्या पावसाने मिरची पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बाजारात लाल मिरची पहिल्यापासूनच तेजीत आहे. प्रत्येक वर्षी सुरुवातीला मिरचीला तेजी असते, नंतर हळूहळू दर आवाक्यात येतात.
मात्र, यंदा आवक कमी असल्याने अद्याप तेजी कायम आहे. त्यात गेल्या आठ दिवसांत किलो मागे शंभर रुपयांची वाढ झाली आहे. आपल्याकडे 'ब्याडगी 'लाच अधिक पसंती दिली जाते.
मिरचीच्या दरात अशी झाली वाढ (प्रतिकिलो)
मिरची - आठवड्यापूर्वीचा दर रु. (सध्याचा दर रु.)
ब्याडगी - ४०० (५००)
जवारी - २८०(३२५)
लवंगी - ३०० (३२५)
काश्मिरी - ६०० (७५०)
केडीएल - ७०० (८००)
आणखी पन्नास रुपयांनी दर वाढणार?
मे महिन्यात मिरची मागणी एकदम वाढते आणि तेवढी आवक होणार नाही. त्यामुळे, एप्रिलपेक्षा मे महिन्यात किलो मागे किमान ५० रुपयांची वाढ होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.
अधिक वाचा: लाईट बिल अजून कमी होणार, आता मिळणार डिस्काउंट; कोणत्या युनिट स्लॅबला किती रुपये डिस्काउंट?
