अहिल्यानगर : पणन महासंघामार्फत हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किमतीनुसार भरडधान्य (मका, बाजरी, रागी, ज्वारी-मालदांडी व संकरित) खरेदी सुरू करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी केले आहे. अहिल्यानगर तालुक्यात नोंदणी साईकृपा पणन सहकारी संस्था मर्यादित येथे सुरू आहे.
श्रीगोंदा तालुक्यासाठी संभाजीराजे बहुउद्देशीय सहकारी संस्था, घुटेवाडी, सखूबाई विविध कार्यकारी सेवा सोसायटी, घोगरगाव आणि श्रीदत्तकृपा पणन सहकारी संस्था मर्यादित, घारगाव येथे व्यवस्था आहे.
कर्जत तालुक्यासाठी अंध अपंग उद्योजक सेवाभावी संस्था, मिरजगाव, जामखेडसाठी चैतन्य कानिफनाथ कृषी व फळ प्रक्रिया सहकारी संस्था, खर्डा, शेवगावसाठी नाथकृपा बहुउद्देशीय सहकारी संस्था, बोधेगाव, पाथर्डीसाठी अकोले परिसर सहकारी दूध उत्पादक संस्था, अकोले, कोपरगावसाठी बहादराबाद विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, रांजणगाव देशमुख आणि संगमनेरसाठी किसान विकास कृषी प्रक्रिया सहकारी सोसायटी, पेमगिरी येथे नोंदणी व खरेदी सुरू आहे.
कृषी विभागाकडून प्राप्त पीकपेरा नोंदीनुसार, केवळ बाजरी व मका या पिकांसाठी नोंदणी व खरेदीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ज्या तालुक्यात खरेदीदार संस्था नाहीत, त्या तालुक्यांना जवळच्या खरेदी केंद्रांशी जोडण्यात आले आहे.
त्यानुसार अहिल्यानगर खरेदी केंद्र पारनेरशी, शेवगाव नेवासाशी, कोपरगाव राहाताशी, संगमनेर श्रीरामपूर-अकोलेशी, तर पाथर्डी राहुरीशी जोडण्यात आले आहे.
शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभघेण्यासाठी शेतकऱ्यांनी चालू हंगामात उत्पादित मका व बाजरीची नोंदणी नजीकच्या खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन करावी, असेही जिल्हा पणन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
हमीभाव (प्रति क्विंटल)
◼️ मका - २,४०० रुपये.
◼️ बाजरी - २,७७५ रुपये.
◼️ रागी/नाचणी - ४,८८६ रुपये.
◼️ ज्वारी (मालदांडी) - ३,७४९ रुपये.
◼️ ज्वारी (संकरित) - ३,६९९ रुपये.
३० नोव्हेंबरपर्यंतच नोंदणी
भरडधान्य नोंदणीचा कालावधी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत असून खरेदी कालावधी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राहणार आहे.
ऑनलाइन नोंदणी नाही
◼️ नोंदणीसाठी ७/१२ व ८-अ उतारा, ७/१२ वर चालू हंगामातील पीकपेरा.
◼️ आधारकार्ड, आधार लिंक असलेले बँक पासबुक ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
◼️ नोंदणी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांचा लाईव्ह फोटो घेतला जाणार असल्यामुळे ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध नाही.
पावती जतन करून ठेवा
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पोर्टलद्वारे शेतकऱ्यांच्या नोंदणीतील मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे खरेदीसाठीची वेळ व तारखेची सूचना पाठविण्यात येईल. खरेदी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ऑनलाइन खरेदी पावती डाउनलोड करून जतन करावी.
अधिक वाचा: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; कर्जवसुली संदर्भात शासनाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय
