Pomegranate Price: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील डाळिंबाला प्रतिकिलोस तब्बल ६०० रुपये इतका विक्रमी भाव मिळाला. डाळिंबाचे वजन हे ८०० ग्रॅम इतके होते. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मोही गावातील शेतकरी सचिन आबाजी देवकर यांच्या शेतातून मालाची आवक झाली होती. मार्केट यार्डातील रावसाहेब दिनकर कुंजीर यांच्या गाळ्यावर ही आवक झाली.
देवकर यांच्या शेतातून २३ कॅरेट डाळिंबाची एकूण ४०० किलोची आवक झाली होती. त्यातील तब्बल ३६ किलो डाळिंबाला ६०० रुपये इतका प्रतिकिलोस भाव मिळाला.
१८ किलो डाळिंबाला ४०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे, ८८ किलो डाळिंबाला ३३५ रुपये प्रतिकिलो प्रमाणे, ८६ किलो डाळिंबाला २८० प्रतिकिलोप्रमाणे, ७० किलो डाळिंबाला २३५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे भाव मिळाला आहे.
या डाळिंबाची खरेदी ही धनराज मोटे यांनी केली. याबाबत व्यापारी शरद कुंजीर म्हणाले की, सचिन देवकर हे प्रगतिशील शेतकरी आहेत. डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी देवकर यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. यंदा चांगला भाव मिळाला आहे.
आमच्याकडे ६ एकर शेतीमध्ये डाळिंबाची लागवड केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून डाळिंबाचे उत्पादन घेतो. ऑरगॅनिक खतांचा वापर केला जातो. त्यामुळे दर्जेदार उत्पादन होते. डाळिंबाला मिळालेल्या विक्रमी भावामुळे कष्टाचे सार्थक झाले आहे. - सचिन आबाजी देवकर, डाळिंब उत्पादक शेतकरी
अधिक वाचा: जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात पुन्हा बदल; नववर्षात आता कुणाला मिळणार किती धान्य?
