सागर कुटे
राज्यातील कांदाबाजारात गत आठवड्यात दरात सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे कांद्याची एकूण आवक घटलेली असतानाही दरांवर दबाव कायम राहिल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
आठवडाभराच्या बाजार आकडेवारीनुसार, मागील आठवड्याच्या तुलनेत राज्यातील कांद्याची एकूण आवकमध्ये सुमारे १७.३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
२८ डिसेंबर रोजी राज्यात सुमारे ९६.३ हजार टन कांद्याची आवक झाली होती. आवक कमी असूनही अपेक्षित दरवाढ न झाल्याने बाजारातील स्थिती विरोधाभासी ठरत आहे.
धोरणात्मक बदल झाल्यास दरांना आधार
• उत्पादन खर्च वाढलेला असताना कांद्याच्या दरात होत असलेली घसरण शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणी वाढवणारी ठरत आहे.
• आगामी काळात आवक आणखी कमी झाल्यास किंवा निर्यात धोरणात सकारात्मक बदल झाल्यास दरांना काही प्रमाणात आधार मिळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
• सध्या मात्र, राज्यातील कांदा बाजारात आवक घटूनही दर घसरल्याचे चित्र दिसून येत असून, पुढील आठवड्यातील बाजारस्थितीकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे.
लासलगाव बाजारात सर्वाधिक, सोलापुरात सरासरी सर्वात कमी दर !
• राज्यातील प्रमुख कांदा बाजार समित्यांमधील दरांचा विचार करता, लासलगाव बाजारात सरासरी १,९०० रुपये प्रति क्विंटल असा सर्वाधिक दर नोंदविण्यात आला.
• पिंपळगाव बाजारात सरासरी २ १,५५० ते १,५६० रुपये, पुणे बाजारात सुमारे १,३७५ रुपये, कोल्हापूरमध्ये १,४३० रुपये, तर सोलापूर बाजारात सरासरी केवळ १,१०० ते १,१५० रुपये प्रति क्विंटल दर राहिला, जो राज्यातील सर्वात कमी आहे.
देशांतर्गत मागणीत अपेक्षित वाढ नाही !
तज्ज्ञांच्या मते, साठवणुकीतील कांद्याची विक्री, निर्यातीबाबत असलेली अनिश्चितता, तसेच देशांतर्गत मागणीत अपेक्षित वाढ न झाल्यामुळे कांद्याच्या दरांवर दबाव आला आहे.
काही भागांत दर्जेदार कांद्याची कमतरता असली, तरी मध्यम व हलक्या प्रतीच्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सरासरी दर घसरले आहेत.
