सोलापूर : वादळी वारे, अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळं मागील दोन दिवसांपासून बाजार समितीत कांद्याच्या आवक निम्म्यानं कमी झाली आहे.
शिवाय कमी प्रतीचा कांदाबाजारात विक्रीसाठी येत असल्याने भावातही घसरण झाल्याचे पाहावयास मिळत आहे. दरम्यान, मार्च महिन्यात कांद्याची आवक ५०० ट्रक गाड्यांवर गेली होती.
मात्र, एप्रिल महिन्यात आवक थोडीथोडी कमी होत गेली. १५ एप्रिलनंतर आवक घटत गेली, त्यात अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळं कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
काढणीला आलेला कांदा पाण्यात भिजला अन् काढून ठेवलेला कांदा हवामानामुळे खराब झाला. काही शेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणला खरा; पण चांगल्या प्रतीचा नसल्याने भाव मिळाला नाही.
विजयपूर, मराठवाड्यातून चांगल्या प्रतीचा कांदा विक्रीला येत आहे, त्या कांद्याला चांगला दर मिळत असल्याचे व्यापारी सांगतात. सोमवारी चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याशी वाद घातला.
सर्वसाधारण काय मिळतोय दर?
◼️ मंगळवारी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत १०२ ट्रक कांद्याची आवक झाली.
◼️ मंगळवारी प्रतिक्विंटल किमान दर १००, कमाल १४००, तर सर्वसाधारण दर ५०० रुपये असा दर मिळाला.
◼️ मंगळवारी २० हजार ४८२ पिशव्या, १० हजार २४१ क्विंटल कांद्यातून ५१ लाख २० हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली.
अधिक वाचा: वडिलोपार्जित शेतजमीन वाटणीचा खर्च आता वाचणार; वाचा महसूल विभागाचा 'हा' नवीन निर्णय?
